विसर्जन मिरवणुकीत ध्वनिपातळीची मर्यादा ओलांडणारे मंडळे, तसेच ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवठादारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आठ खटले दाखल केले. पुणे पोलिसांनी येरवडा, हडपसर, वानवडी, विमानतळ, चंदननगर, कोथरूड भागातील मंडळे, ध्वनियंत्रणा पुरवठादारांविरुद्ध आठ गुन्हे दाखल केले आहेत.
हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवड: अजित पवार पालकमंत्री होताच बालेकिल्यात फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष
विसर्जन सोहळ्यात विविध मार्गांवरील सुमारे ७० ते ८० खटले ध्वनिमर्यादा तपासण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा यांनी दिली. विसर्जन मिरवणूक, तसेच उत्सवाच्या कालावधीत उच्चक्षमतेची ध्वनिवर्धक वापरल्याने नागरिकांना त्रास झाला होता. याबाबत सामान्य नागरिक, तसेच विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर नाराजी व्यक्त केली होती. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती.