मुंबई-बेंगलोर बाह्य़वळण महामार्गावरील किवळे फाटा ते नवीन कात्रज बोगदा दरम्यान ३४ किलोमीटरच्या पट्टय़ात एकूण वीस अपघात प्रवण ठिकाणे पोलिसांनी आढळून आली आहेत. त्या ठिकाणी होणाऱ्या अपघाताची कारणे आणि उपाययोजना यांची माहितीचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठविण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.
मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग चारच्या बाह्य़वळण महामार्गावरील किवळे फाटा ते नवीन कात्रज बोगदा दरम्यान होणाऱ्या गंभीर आणि मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या अपघातांचा वाहतूक शाखेने अभ्यास केला आहे. या पट्टय़ामध्ये गेल्या तीन वर्षांत एकशे अकरा जणांचा अपघातात मृत्यू झाला असून ४७ जण गंभीर जखमी आहेत. अपघात होणारी वीस ठिकाणे आढळून आली आहे. या अपघातामध्ये ४३ पादचारी, पन्नास दुचाकी चालक, १७ चारचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. या महामार्गाचा अभ्यास पोलीस निरीक्षक संजय भांबुरे, अभियंते प्रतापसिंह भोसले यांनी केला आहे, असे पांढरे यांनी सांगितले.
अत्यंत छोटय़ा-लक्षात न येणाऱ्या चुका आणि वाहतूक साक्षरतेचा अभाव यामुळे गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील त्रुटी दूर केल्यास ते कमी होईल, असेही ते म्हणाले.
अपघातप्रवण वीस ठिकाणे
नवीन कात्रज बोगदा, दरी पूल, आंबेगाव बुद्रुक, मनाजीनगर नऱ्हेगाव, वडगाव पूल, मुठानदी पूल, वारजे पुल, डुक्कर खिंड, चांदणी चौक, बांदल इस्टेट, एचईएमआरएल, सूस रस्ता ते सुतारवाडी, किलरेस्कर कंपनीच्या समोर, बालेवाडी मैदानाच्या समोर, मुळा नदीलगत, वाकड पूल, इंदिरा कॉलेजसमोर, साई पेट्रोल पंप समोर, हॉटेल गोकुळ समोर, हॉटेल राजमुद्रासमोर
अपघाताची मुख्य कारणे
 या ठिकाणी अपघात होणारी काही प्रामुख्याने कारणे दिसून आली आहे. त्यामध्ये पंक्चर केलेले दुभाजक, सव्‍‌र्हिस रस्ता आणि महामार्ग रस्ता एकत्रित, उतार आणि वळणाचा रस्ता, पादचारी आणि वाहनचाकांकडून भुयारी मार्गाचा वापर कमी, रस्त्यावर दिवे आणि वाहतूक चिन्हाचा आभाव, रहिवासी, महाविद्यालय आणि कंपन्याजवळील दुभाजकांवर रेलिंग नाही, दुभाजकावरील झाडांची उंची सलग आणि समान नाही.
एनएचएआयला केलेल्या सूचना
– २० ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र असे फलक लावावेत.
– अपघाताच्या ठिकाणी प्रामुख्याने उतार व वळण आहे. त्या ठिकाणी दिवे, वाहतूक चिन्हे लावावेत.
– अपघाताच्या ठिकाणी महाविद्यालय, बांधकाम रहिवासी वस्ती आहे. अशा ठिकाणी दुभाजकांवर रेलिंग लावावेत व पादचारी भुयारी मार्ग तयार करावेत.
– रस्तादुभाजक ठिकठिकाणी अनावश्यकपणे तोडले आहेत, ते पुन्हा जोडून घ्यावेत.
– राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावरून सव्‍‌र्हिस रस्त्याला येणारे ‘यु-टर्न’ बंद करावेत.
– सव्‍‌र्हिस रस्ता व इतर रस्ते महामार्गास मिळतात, तिथे रिफ्लेक्टर, वाहतूक चिन्हे लावावीत.
– नियोजित पादचारी व भुयारी मार्ग, उड्डाणपुलाची कामे विहित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.
– वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमित कारवाई केली जाईल.

Story img Loader