लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : चंदन चोरट्यांना पकडणाऱ्या गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना मध्यरात्री विधी महाविद्यालय रस्त्यावर घडली. चोरट्यांनी हल्ला केल्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलीस शिपायाने पिस्तुलातून गोळीबार केला.
चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीश शिपाई तांबे जखमी झाले आहेत. विधी महाविद्यालय रस्ता परिसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलीस शिपाई तांबे आणि सहकारी गस्त घालत होते. त्यावेळी चोरटे एका गल्लीत शिरले. या भागातील एका सोसायटीतील चंदनाचे झाड कापण्याच्या तयारीत चोरटे होते. चोरट्यांना पाहून पोलिसांना संशय आला. त्यांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाच ते सहा चोरट्यांनी पोलीस शिपाई तांबे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यावर हल्ला चढविला. झटापटीत तांबे यांच्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी तांबे यांनी त्यांच्याकडील पिस्तूलातून चोरट्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. अंधारात चोरटे पसार झाले.
आणखी वाचा-‘नोटा’चा धोका!
या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. चोरट्यांनी गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्यांनी स्वसंरक्षणार्थ चोरट्यांवर गोळीबार केला, असे पोलिसांनी सांगितले.
शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. फर्ग्युसन रस्ता परिसरातील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी बंगला मालकाला दगड भिरकावून मारण्याची धमकी देेऊन चंदनाचे झाड कापून नेले. दोन महिन्यांपूर्वी प्रभात रस्त्यावरील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी वकील महिलेला शस्त्राचा धाक दाखवून चंदन चोरी केली होती. चंदन चोरट्यांनी आता थेट नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा-पिंपरीत मोठा ट्विस्ट! आमदार अण्णा बनसोडे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता; शहराध्यक्षांचे सूचक विधान
चंदन चोरट्यांचा धुमाकूळ
आठवड्यापूर्वी विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली होती. शहरातील सोसायटी, शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्थांच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुकुंदनगर, मार्केट यार्ड, प्रभात रस्त्यावरील सोसायटीत शिरून चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली होती. चोरट्यांनी वकील महिलेला शस्त्राचा धाक दाखवून चंदनाचे झाड कापून नेले. खडकीतील दारुगोळा कारखान्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेण्यात आले. चंदन चोरीच्या घटना वाढत असून, चोरट्यांनी आता थेट पोलीस आणि नागरिकांवर हल्ले सुरू केले आहेत.
सेनापती बापट रस्त्यावर चंदन चोरी
सेनापती बापट रस्त्यावरील नवराजस्थान सोसायटीच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी एका बंगल्यातून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत निलेश मकरंद उर्सेकर (वय ५०) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र भिसे तपास करत आहेत.