पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र आग्रा येथून महाराजांनी सुटका करून घेतल्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी केलेला दावा गेल्या काही दिवासांपूर्वी चांगलाच चर्चेत आला आहे. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती.
पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या विश्वस्त पदावर राहुल सोलापूरकर आहेत. त्या संस्थेच्या विश्वस्त पदावरून राहुल सोलापूरकर यांना हटविण्यात यावे, या मागणीसाठी काल अखंड मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेमध्ये आंदोलन केले. तर यावेळी राहुल सोलापूरकर यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला होता. त्यानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यावर राहुल सोलापूरकर माझ्या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
पुणे शहरात काल झालेल्या आंदोलनाची दखल पुणे पोलिसांनी घेतली असून कोथरूड भागातील ‘लक्ष्मी कवच’ या सोसायटीमध्ये राहुल सोलापूरकर राहण्यास आहेत त्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.