ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एमआयएम) खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणामुळे चर्चेत असलेल्या ‘मुस्लीम आरक्षण परिषदे’ला अखेर पुणे पोलीसांनी अटींवर परवानगी दिली. ही परिषद आता कोंढव्यातील कौसरबाग या बंदिस्त सभागृहात आज संध्याकाळी होणार आहे. परिषद बंदिस्त सभागृहात घ्यावी. संध्याकाळी सहा वाजण्यापूर्वी परिषदेचा समारोप करावा आणि ओवेसी यांनी परिषदेमध्ये कोणतेही प्रक्षोभक भाषण करू नये, अशा अटी पोलीसांनी घातल्या आहेत. नियम १४४ नुसार ओवेसी यांना पोलीसांनी नोटीसही बजावली आहे. दरम्यान, या सभेविरोधात शिवसेनाही आक्रमक झाली असून, शिवसेनेकडून एनआयबीएम रस्त्यावर निदर्शने करण्यात येणार आहेत.
असदुद्दीन ओवेसी यांच्या पुण्यातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली
पुणे कॅन्टोमेन्ट बोर्डाने जागेचे ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे पुणे पोलीसांनी गोळीबार मैदानावर होणाऱया सभेला सोमवारी परवानगी नाकारली होती. त्याचवेळी बंदिस्त सभागृहात सभा घेण्याची सूचना पोलीसांनी आयोजकांना केली होती. त्यानंतर कौसरबागेमध्ये सभा घेण्याचा प्रस्ताव आयोजकांकडून पोलीसांपुढे ठेवण्यात आला. त्याला पोलीसांनी अटींवर ना हरकत परवानगी दिली आहे.
अ‍ॅक्शन कमिटी महाराष्ट्र व मुलनिवासी मुस्लिम मंचच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील उपस्थित राहणार असून, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांचे भाषण होणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे नाटक कंपनी- ओवेसी