पुणे : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या युवतीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आरोपी आठ दिवसांपूर्वी न्यायालयाकडून जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडला होता. प्रशांत बाबू रायकर (वय २६, रा. भैरवनाथनगर, एनडीए रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रायकर सराईत असून त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला होता.
आठ दिवसांपूर्वी तो कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडला होता. तक्रारदार युवती आणि तिची मैत्रीण पीएमपी बसमधून प्रवास करत होती. त्या वेळी रायकरने तिचा पाठलाग केला. त्याने युवतीला विवाहासाठी धमकावले. विवाह न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिला धक्काबुक्की केली. घाबरलेल्या युवतीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर रायकरला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.