‘मोक्का’ कारवाईचे अर्धशतक; ५१ टोळ्यांतील ३५७ गुन्हेगारांवर कारवाई
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चोरीचे दागिने स्वीकारणाऱ्या तीन सराफा व्यावसायिकांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. याबरोबरच १२ संघटीत गुन्हेगारी टोळ्यामधील ६० आरोपींवर करत ‘मोक्का’ कारवाईचे अर्धशतक पूर्ण केले. २०२३ मध्ये ५१ टोळ्यांतील ३५७ गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने कारवाई केली.
हेही वाचा >>> नववर्षाच्या मध्यरात्री गोव्यातील एक कोटी रुपयांचे मद्य जप्त; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
दर्शन रमेश पारेख ( वय ३२), गणपत जवाहरलाल शर्मा (वय ४४) आणि सुरजभान सिध्दराम अगरवाल (वय ७८, तिघे रा. खडकी) अशी कारवाई केलेल्या सराफा व्यावसायिकांची नावे आहेत. वाकड मधील टोळी प्रमुख रोहन ऊर्फ गंग्या वासुदेव वाघमारे ( वय २८) चाकण मधील शुभम युवराज सरोदे ( वय २१), निगडीतील आरोपी मोहम्मद ऊर्फ मम्या मेहबूब कोरबू (वय २८) पिंपरीतील प्रकाश ऊर्फ डब्बल सुरेंद्र राम (वय ३०) , आकाश ऊर्फ जिलब्या यादव गायकवाड (वय २६), सांगवीतील आनंद सुनिल साळुंके उर्फ लोहार (वय १९), अक्षय ऊर्फ जोग्या हेमंत जाधव ( वय २५), निगडीतील लखन ऊर्फ बबलू अवधुत शर्मा (वय १९), भोसरीतील अक्षय नंदकिशोर गवळी (वय २८), चिखलीतील मन्नू ऊर्फ अतिष बलदेव कोरी ( वय २१) हे सर्व टोळी प्रमुख आणि त्यांच्या साथीदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा >>> हडपसरमधील कालव्यात दोन मृतदेह सापडले
आरोपींनी अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वत:चे गुन्हेगारी वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. टोळी प्रमुख म्हणून हिंसाचाराची धमकी देवून किंवा धाक दपटशहा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी खून, खूनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, दरोडा, जबरी चोरी,अप्रमाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे, तोडफोड करणे, विनयभंग, अपहरण, खंडणी, दरोडा, दंगा करणे, अश्लिल वर्तन करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे या सर्वांवर दाखल आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘मोक्का पॅटर्न’ राबविला आहे. २०२३ मध्ये ५१ टोळ्यांतील ३५७ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त स्थापन झाल्यापासून मागीलवर्षी सर्वाधिक गुन्हेगारांवर ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली.