शहरात तीन संशयित व्यक्ती घुसल्या असून त्यांच्याकडून घातपात घडवून आणण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलिसांना गुप्तवार्ता विभागाकडून मिळाली आहे. त्यानुसार शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहून या तीन व्यक्तींचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरात घातपात होण्याचा गुप्तचर यंत्रणांकडून सतत इशारा दिला जात आहे. जुलै महिन्यात १२ ते २१ जुलै दरम्यान घातपाताचा खास इशारा देण्यात आला होता. त्यानुसार शहरातील बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली होती. जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटाला एक वर्षे पूर्ण होत असल्यामुळे शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यातच पुण्यात तीन संशयित व्यक्ती आल्याची माहिती पुणे पोलिसांना गुप्तचर यंत्रणांकडून २८ जुलै रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास देण्यात आली आहे. या तीन व्यक्ती मुंब्रा रेल्वे स्थानकावर आपापसात चर्चा करत होते. त्या वेळी ‘ठाणे जिल्ह्य़ातील कळवा या ठिकाणी पायी पोहोचायचे आहे. आपले काम पूर्ण झाल्यानंतर पुण्याकडे रवाना होऊ’ अशी चर्चा करत असताना त्यांना एका व्यक्तींने पाहिले. संशयित व्यक्ती या साधारण ३५ ते ४० वयोगटातील असून एकाच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला जुन्या जखमेची खूण आहे, तर दुसऱ्या व्यक्तीच्या उजव्या हातावर जुन्या जखमेच्या दोन खुणा आहेत. त्यामुळे अशा वर्णनाच्या  संशयित व्यक्ती शहरात घातपात घडवूण आणणे किंवा एखाद्या गंभीर गुन्ह्य़ाशी संबंधित असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सर्व पोलीस ठाण्यांनी सतर्क राहून आपल्या हद्दीत संशयित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी, अशा सूचना विशेष शाखेच्या उपायुक्तांनी दिल्या आहेत.

Story img Loader