पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर पोेलिसांनी गस्त वाढविली. मात्र, पोलिसांची गस्त कागदावरच असल्याचे दिसून आले. शनिवारी पहाटे एका प्रवाशाच्या पिशवीतून लॅपटाॅप चोरून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली.याबाबत एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण वाकड भागात राहायला असून, सेनापती बापट रस्त्यावरील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. ते मूळचे महाडचे आहेत. शनिवारी पहाटे ते पत्नी आणि मुलासोबत गावी निघाले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास ते स्वारगेट एसटी स्थानकात आले. त्यानंतर महाडकडे जाणाऱ्या बसमध्ये त्यांनी प्रवेश केला. बसमधील सामान ठेवण्याच्या जाळीत त्याने लॅपटाॅप असलेली पिशवी ठेवली होती. बस सुरू होण्यापूर्वी त्यांनी सामानाची तपासणी केली तेव्हा लॅपटाॅप ठेवलेली पिशवी चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शिरसाट तपास करत आहेत.

स्वारगेट स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी प्रवासी तरुणीवर वाहक असल्याची बतावणी करून आरोपी दत्तात्रय गाडेने बसमध्ये बलात्कार केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी स्वारगेट परिसरात गस्त वाढविली होती. आवारात पोलिसांची गाडी, तसेच कर्मचारी तैनात आहेत. बंदोबस्त तैनात असताना शनिवारी सकाळी प्रवाशाकडील लॅपटाॅप चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांची गस्त कागदावरच असल्याचे दिसून आले आहे.