पिंपरी : वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी चालकासोबत सातत्याने संवाद ठेवावा. त्याच्या समस्या, अडचणी समजून घ्यायला हव्यात. चालकाचे मानसिक आरोग्य सांभाळण्याबरोबरच चालकाच्या वर्तनातील बदल ओळखायला शिका, आगीची किंवा इतर अपघाताची घटना घडल्यास काय खबरदारी बाळगावी याचे प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतूक सेवा पुरविणार्‍या कंपनींच्या प्रतिनिधींना दिल्या.

हिंजवडीतील व्योम ग्राफीक्स या प्रिटींग प्रेस कंपनीतील बस चालकाने कामगारांसोबतचा वाद आणि दिवाळीत पगार न दिल्याच्या रागातून कंपनीतील रसायनाच्या सहाय्याने बसमध्ये आग लावून कामगारांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे समोर आले. यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, दोघे गंभीर जखमी आहेत. हिंजवडी माहिती व तंत्रज्ञान नगरीत शेकडो कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. तीन पाळ्यामध्ये (शिफ्ट) या कंपन्यांचे काम चालते. त्यामुळे कर्मचार्‍यांना प्रवासासाठी वाहतूक कंपन्यांकडून किंवा कंपनीच्या स्वत:च्या वाहनांद्वारे प्रवासी सेवा पुरविली जाते. बुधवारी घडलेल्या घटनेमुळे या वाहनांमधून प्रवास करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कन्हैय्या थोरात यांनी तातडीने वाहतूक सेवा पुरविणार्‍या कंपनींच्या प्रतिनिधींसमवेत बैठक बोलावली. ३५ कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

वाहतूक सेवा पुरविणार्‍या कंपन्यांचे चालक तसेच कंपन्यांच्या अस्थापनेवरील चालक हे दररोज वाहन चालवत असतात. पुणे ते पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांचा दररोजचा प्रवास असतो. शहरातील वाहतूक कोंडीतून त्यांना वाहन चालवावे लागते. वाहतूक कोंडीमुळे अनेकदा मोठ्या वाहन चालकांना इतर वाहन चालकांचे बोलणे खावे लागते. अनेक दुचाकी चालक वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत मोठ्या वाहन चालकांच्या समोर अचानक दुचाकी आडवी घालणे, धक्का मारणे असे प्रकार करतात. त्यामुळे मोठ्या वाहनांवरील चालकांची चिडचिड होते. कंपनी व्यवस्थापन किंवा इतर कर्मचार्‍यांशी चालकाचे वाद असतील, तर मोठी घटना घडू शकते. त्यामुळे वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी चालकासोबत सातत्याने संवाद साधायला हवा. त्याच्या समस्या, अडचणी समजून घ्यायला हव्यात, अशा सूचना पोलिसांनी बैठकीत दिल्या.

Story img Loader