बारामती : सार्वजनिक ठिकाणी; तसेच शाळा, कॉलेज परिसरात महिलांंच्या छळाचे प्रकार रोखण्यासाठी बारामतीत पोलिसांनी ‘शक्ती बॉक्स’ हा उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक गावात महिलांच्या सुरक्षतेसाठी ‘शक्ती बॉक्स’च्या माध्यमातून राबविलेले उपक्रम आणि गुन्हेगारांच्या समाज माध्यमांंवरील हालचालींवर पोलीस नजर ठेवत असल्याने या ‘शक्ती-बॉक्स’चा गुन्हेगारांंवर वचक बसला आहे. त्यामुळे महिलांंच्या छळाचे गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.

या उपक्रमांंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन येथील महिला आणि नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे. गावातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या समाज माध्यमांंवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी खास पथके तयार करण्यात आली आहेत. गाव, शहर आणि एमआयडीसी भागातील गुन्हेगारी मोडीत काढणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

‘एमआयडीसी’त काम करणाऱ्या महिलांना कोणीही त्रास देत असेल, तर पोलिसांशी संपर्क साधावा, गावात अथवा परिसरात अनोळखी, संशयित व्यक्ती आल्यास त्याला मारहाण न करता पोलिसांना कळविणे, चोर आल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता अफवा पसरविणाऱ्याची माहिती पोलिसांना देणे, ग्रामीण भागातील महिलांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता धाडस करून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस करत आहेत. विधिसंघर्षित गुन्हेगारांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून रोखण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे.

‘शक्ती बॉक्स’ उपक्रमाची वैशिष्ट्ये

– प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र शक्ती टेबलची व्यवस्था

– उपविभागात २०० पेक्षा अधिक तक्रार पेटी

– प्रत्येक पथकात एक अधिकारी आणि आठ कर्मचारी

– निर्भया पथकांंचे सहकार्य

– उपविभागीय अधिकारी यांचे नियंत्रण

– पोलीस ठाण्यात महिला तक्रारदारांना सौजन्याने वागणूक देणे

– गुन्हेगारांंच्या समाज माध्यमावरील ‘रील्स’वर नजर

– गाव, प्रभाग, वार्डनिहाय भेटी

– गावात गुन्हा घडू नये, यासाठी सर्वप्रथम पोलीस पाटील यांनी माहिती देणे अनिवार्य

ग्रामीण भागातील प्रत्येक महिला सुरक्षित राहण्यासाठी सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि प्रत्येक घरातील व्यक्ती या उपक्रमाचा भाग होत आहेत. या उपक्रमामुळे महिलांबाबतचे गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.-डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी