पुणे : सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी, विठ्ठल नगर या भागातील पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी पुणे दौऱ्यावर आले होते. सिंहगड रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा एकतानगरीकडे जाणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून सिंहगड रस्त्याला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. प्रत्येक चौकात दहापेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी हटविण्यात येत होत्या. जी वाहने हटविली गेली नाहीत, त्यांना टोईंग करून बाजूला करण्यात येत होते. मुख्यमंत्री कुठवर आले, याची जसजशी माहिती मिळत होती, तसतशी धायरीकडून राजाराम पुलाकडे जाणारी वाहतूक रोखून धरण्यात येत होती. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, म्हणून पुणे पोलिसांची तारांबळ उडाल्याचे चित्र दुपारच्या सुमारास होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, त्यानंतर शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट आणि त्यानंतर सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी या भागातील पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री शिंदे पुणे दौऱ्यावर आले होते. सांगवी, पाटील इस्टेट येथील नागरिकांना भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा शिवाजीनगर येथून सिंहगड रस्त्याकडे मार्गस्थ झाला. त्यामुळे दांडेकर पुलापासून संतोष हॉल चौकापर्यंत चौकाचौकात दहापेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. खासकरून राजाराम पुलापासून संतोष हॉल चौकापर्यंत उड्डाणपुलाच्या कामामुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते.
हेही वाचा – पुणे : लष्कर भागात टोळक्याची ‘गटारी’ला मद्याच्या दुकानात तोडफोड
दुपारी सव्वातीनच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा रांका ज्वेलर्सच्या चौकातून पुढे मार्गस्थ झाला. या चौकाकडे जाताना अलीकडे एक स्कॉर्पिओ रस्त्यावरच पार्क करण्यात आली होती. वाहतुकीत हे वाहन अडथळा ठरत असल्याने ते टोईंगच्या सहाय्याने रस्त्यातून बाजूला करण्यात आले. सीएम येताना वाहतूक कोडी होऊ नये म्हणून सिंहगड रस्त्यावर प्रत्येक चौकात दहापेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. टोईंग वाहन, दुचाकी उचलणारे वाहन तैनात होते. मुख्यमंत्री सिंहगड रस्त्यावर आल्याची वर्दी मिळताच रांका ज्वेलर्स चौकातून धायरीकडे जाणारी वाहतूक सुसाट सोडण्यात येत होती, तर धायरीकडून राजाराम पुलाकडे जाणारी वाहतूक रोखून धरण्यात आली होती. तसेच कॅनॉल रस्त्यावरून उजवीकडे वळून राजाराम पुलाकडे जाणारी वाहतुकही रोखून धरण्यात आली होती.
हेही वाचा – आरटीई प्रवेशांसाठी मुदतवाढ, अद्याप ५० हजारांहून अधिक जागा रिक्त
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीची झळ बसू नये, याकरिता दुपारी बारा वाजल्यापासूनच सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल चौकापर्यंत पोलीस कर्मचारी तैनात होते. संतोष हॉल चौकापासून सनसिटीकडे जाणारा रस्ता अतिशय अरुंद असल्याने या रस्त्यावर देखील ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात होते. अपूर्व मेडिकल चौकापासून पुढे एकता नगरीकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरीकेड टाकून रस्ता बंद केला होता. या रस्त्यावरून केवळ पादचाऱ्यांना जाता येत होते.