पोलीस हे सगळ्यात जास्त काम करतात, तरीही नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास का उडत चालला आहे.. कारण पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आलेल्या नागरिकाशी ते सौजन्याने बोलले जात नाहीत. गुन्ह्य़ांची संख्या वाढेल या भीतीने पोलीस गुन्हे दाखल करून घेत नाहीत. त्याचा थेट पोलिसांच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत आहे.. राज्याच्या कारागृह विभागाच्या प्रमुख आणि अपर पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी ही कारणमीमांसा केली. त्याचबरोबर हे बदलण्यासाठी प्रत्येक नागरिकाशी सौजन्याने बोलण्याचा आणि तक्रार नोंदविण्यास प्राधान्य देण्यास सल्ला दिला.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील गुन्हे वार्षिक अहवाल २०१३’ याचे प्रकाशन पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथुर यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी बोरवणकर प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी सीआयडीचे प्रमुख एस.पी. यादव, विशेष महानिरीक्षक ब्रिजेशसिंग, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रशिक्षण प्रबोधिनीचे संचालक संजीव कुमार सिंघल, निवृत्त पोलीस अधिकारी नारायण स्वामी, ए.व्ही. कृष्णन, रवींद्र केदारी, माधव कर्वे आदी उपस्थित होते.
बोरवणकर म्हणाल्या की, पोलिसांना सलग बारा ते चौदा तास काम करावे लागते. म्हणजे इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा पोलीस हे सर्वाधिक काम करतात. पण, गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देणाऱ्या नागरिकाशी सौजन्याने बोलले जात नाही. गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्य़ांची संख्या वाढेल या भीतीने पोलीस गुन्हे दाखल करून घेत नाहीत. त्याचा थेट पोलिसांच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो. त्यामुळे गुन्ह्य़ांची आकडेवारी वाढली तरी चालेल. पण, पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी सौजन्याने बोला आणि प्रत्येक तक्रार नोंदवून घ्या. यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास नक्कीच वाढेल.
याबरोबरच प्रत्येक क्षेत्रात आठ तासाच्या शिफ्टमध्ये काम चालते. मात्र, पोलिसांना सलग बारा ते चौदा तास काम करावे लागते. पोलिसांनाही कौटुंबिक जीवन असून त्यांना कुटुंबीयांना वेळ देता आला पाहिजे. कामामुळे येणाऱ्या ताणामुळे पोलिसांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्याबरोबरच ८० टक्के पोलिसांना घरे मिळाली पाहिजेत, असे असताना फक्त ४१ टक्के पोलिसांनाच घरे मिळाली आहेत. या सर्व परिस्थितीत पोलिसांना काम करावे लागते. या गोष्टींचा नक्की विचार होण्याची आवश्यकता असल्याचे बोरवणकर यांनी नमूद केले. या वेळी सतीश माथूर यांनी आपले विचार व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा