महिला अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटनांनी गेल्या काही दिवसांत राज्य हादरून गेलेलं असताना आता पुण्यात पुन्हा एकदा एक संतापजनक प्रकार घडला आहे. पुण्यातील वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाने एका २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रविण नागेश जर्दे असं या आरोपी अधिकाऱ्यांचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रविण जर्दे हा कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये मे २०१८ मध्ये नेमणुकीला होते. त्यावेळी पीडित तरुणी एका तक्रार देण्यासाठी पोलिस चौकीत आली होती. तेव्हा आरोपी प्रविण पोलिस चौकीत कार्यरत होते. तिथून त्यांची ओळख झाली. त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. त्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. मात्र, जेव्हा त्या तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली तेव्हा त्याने लग्नास नकार देत उलट तिला धमक्या दिल्या.

“मी पोलीस अधिकारी आहे. तुझे तुकडे तुकडे करुन तुला संपवून टाकीन. कोणीही माझं काही वाकडं करु शकत नाही. मी सर्व मॅनेज करेन अशी धमकी देत तिला मारहाण देखील केली. त्यानंतर पीडित तरुणीने घडलेला सर्व प्रकार सांगताच आरोपी प्रविण जर्दे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Story img Loader