लोणावळ्यातील खासगी बंगल्याच्या आवारातील जलतरण तलावातील दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिले. बंगल्यात राहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची नोंद ठेवून सुरक्षेबाबत काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>पुणे: उधळपट्टीचा सायकल मार्ग ! सिंहगड रस्ता ते हडपसर नवीन मार्ग प्रस्तावित; ६६ कोटींचा खर्च अपेक्षित
नाताळ सण तसेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा, खंडाळा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. महिनाभरापूर्वी लोणावळ्यात खासगी बंगल्यातील जलतरण तलावात बुडून बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बंगला मालकांसह कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांनी बंगल्यांचे मालक, बंगल्याची देखभाल करणाऱ्या कामगारांची बैठक आयोजित केली. बैठकीत लोणावळा शहर, ग्रामीण भागातील १०० बंगले मालक सहभागी झाले होते. लोणावळ्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, उपनिरीक्षक संजय जाधव आदी या वेळी उपस्थित होते. या बैठकीत पर्यटकांची सुरक्षा तसेच दुर्घटना टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. बंगल्यातील जलतरण तलावात लहाने मुले सहज उतरणार नाहीत, अशी उपाययोजना कराव्यात. जलतरण तलावाच्या परिसरात तात्पुरते कुंपण घालावे. जलतरण तलाव परिसरात जीवरक्षक नेमावेत, सुरक्षारक्षक ठेवावेत तसेच जलतरण तलावास परवानगी घेणे बंधनकारक असल्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. बंगल्याचा वापर पर्यटक करतात. त्यामुळे बंगल्यांच्या मालकांनी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाकडून (एमटीडीसी) दिला जाणारा परवाना घेणे बंधनकारक आहे.
हेही वाचा >>>पुणे: कोव्हिशिल्डची अद्याप प्रतीक्षा; कोव्हॅक्सिन लशीचा पुरेसा साठा
पर्यटकांची नोंद करावी
बंगल्यात वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांकडून सुरक्षेबाबतचे हमीपत्र भरून घेण्यात यावे. त्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्याची नोंद करावी. शेजाऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. बंगल्याच्या आवारात तसेच प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. महिलांच्या सुरक्षेबाबत विचार करण्यात यावा. कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
दुर्घटना घडल्यास कारवाई
लोणावळ्यातील बंगल्यांच्या आवारात दुर्घटना घडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी बैठकीत दिला. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गर्दी होणार आहे. नियमांचे पालन करून नववर्ष साजरे करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.