पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेवर उपचार करण्यास विलंब केल्याच्या आरोपांनंतर राजीनामा दिलेले डाॅ. सुश्रूत घैसास यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे, पोलिसांनी ही माहिती दिली.
गर्भवती असलेल्या ईश्वरी (तनिषा) भिसे यांच्यावर वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत राज्य आरोग्य विभाग, पुणे धर्मादाय आयुक्त आणि पुणे महापालिकेच्या माता-मृत्यू विभागाचे अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आले आहेत. ससून रुग्णालयाच्या समितीचा चौथा अहवाल वैद्यकीय विभागाला पाठविण्यात आला आहे. डाॅ. घैसास कुटुंबीयांचे कर्वेनगर भागात रुग्णालय आहे. या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. डाॅ. घैसास यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.