पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई यांच्या २६२ रिक्त पदांसाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अवघ्या महाराष्ट्रातून १५ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो उमेदवार पिंपरी- चिंचवड शहरात दाखल झाले आहेत. परंतु, पहिल्या दिवशी तरुणांना मिळेल त्या ठिकाणी झोपून काढावे लागले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बाहेर गावावरून आलेल्या परीक्षार्थींना भोसरी गवळी माथा (भोसरी- निगडी रोड) येथील बालनगरी येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिली आहे.
हेही वाचा : पुणे : अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांची पसंती कोणत्या शाखेला? तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर…
महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शासकीय नोकरी मिळावी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांना मिळेल त्या ठिकाणी झोपावे लागत आहे. अशावेळी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी या परीक्षार्थींची राहण्याची विशेष सोय केलेली आहे. शहरातील भोसरी- निगडी रोड वरील गवळी माथा या ठिकाणी असलेल्या बालनगरीत हॉल क्रमांक पाच, सहा आणि सात या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बहुतांश परीक्षार्थींचे नातेवाईक, मित्रमंडळी हे या शहरात नसल्याने पोलीस भरतीच्या प्रक्रियेसाठी आलेल्या तरुणांना मिळेल त्या ठिकाणी रात्र काढावी लागते. आधीच पावसाळा असल्याने या तरुणांना नाहक त्रासाला देखील सामोरे जाऊ लागू शकतं. अशावेळी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक पाऊल पुढं करत पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांची राहण्याची सोय केल्याने त्यांचं कौतुक होत आहे.