पुणे : भेसळयुक्त तूप तयार करून बाजारात विक्री करणाऱ्या एकाला पाषाण परिसरात पकडले. पाषाणमधील एकनाथनगर भागात पत्र्याच्या खोलीत भेसळयूक्त तूप तयार करण्याचा उद्योग सुरू होता. चतु:शृंगी पोलिसांनी छापा टाकून तेथून सातशे किलो भेसळयुक्त तूप जप्त केले.

सांगसिंग तेजसिंग राजपूत (वय ३८, सध्या रा. बुधवार पेठ, मूळ रा. राजस्थान) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. पाषाण परिसरातील एकनाथनगर भागात पत्र्याच्या खोलीत राजपूतने भेसळयुक्त तूप तयार करण्याचा उद्योग सुरू केला होता. चतु:शृंगी पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस नाईक बाबा दांगडे, इरफान मोमीन यांना याबाबतची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. याबाबतची माहिती पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाला दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक रुपेश चाळके, बाबा दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, ज्ञानेश्वर मुळे आदींनी ही कामगिरी केली.

Story img Loader