पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमुळे आज (मंगळवार) सायंकाळी घबराट उडाली. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसराची तपासणी केली, तेव्हा बॉम्बसदृश कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असल्याचा फोन सायंकाळी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात अज्ञाताने केला. एवढच नाही तर बॉम्ब ठेवल्याची जागा दाखवतो मात्र त्यासाठी सात कोटी रुपये द्यावे लागतील, असेही फोन करणाऱ्याने सांगितले. यामुळे एकच खळबळ उडाली.

त्यानंतर पुणे पोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक रेल्वे स्थानकात दाखल झाले. रेल्वे स्थानक परिसराची तपासणी करण्यात आली. तेव्हा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू आढळून आली नाही. अशाप्रकारचा फोन करुन अफवा पसरविणाऱ्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.