पुणे: महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या पदरी निराशा आली. राज्य शासनाने १५ हजार पदांची पोलीस शिपाई भरती स्थगित केल्याचे आदेश शनिवारी दिले. महाराष्ट्र पोलीस दलातील प्रशिक्षण आणि विशेष पथकाचे महासंचालक संजय कुमार यांनी पोलीस शिपाई भरती स्थगित केल्याबाबतचे आदेश शनिवारी (२९ ऑक्टोबर) दिले. पोलीस भरतीचा पुढील दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. पोलीस शिपाई संवर्गातील १४ हजार ९५६ पदांची भरती प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. प्रशासकीय कारणास्तव भरती प्रक्रिया तूर्त स्थगित करण्यात आल्याचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा >>> पुण्यात शिंदे गटाकडून बॅनरबाजी, ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’ म्हणत उद्धव ठाकरेंना लक्ष्य

गेले तीन वर्ष पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झाली नव्हती. राज्य शासनाने पोलीस भरतीची घोषणा केल्यानंतर उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. उमेदवारांनी तयारी सुरू केली होती. मैदानी परीक्षेसाठी उमेदवारांनी सराव सुरू केला होता. लेखी परीक्षेची तयारी अनेकांनी केली होती. मात्र, पोलीस भरती प्रक्रिया स्थगित केल्यानंतर उमेदवारांमध्ये निराशा पसरली. दरम्यान, ग्रामविकास आणि जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेतील अनिश्चितीमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. गेले तीन वर्ष सरळसेवा भरती प्रक्रिया सुरळीत पार पडली नसल्याने उमेदवारांमध्ये निराशा आहे.

Story img Loader