लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शुश्रूषेसाठी ठेवलेल्या एकाने ज्येष्ठ नागरिकाची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका वकिलाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सूरज राजेंद्र पवार (वय ३२, रा. जैनापूर, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार कोथरुड भागात राहायला आहेत. त्यांचे वडील आजारी असून, ते अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांची शुश्रूषा करण्यासाठी एकाला त्यांनी ठेवले होते. तो मूळचा कोल्हापूरचा आहे. कामानिमित्त तो कोल्हापूरला गेल्यानंतर त्याने आरोपी सूरज पवारला तेथे कामास पाठविले.

आणखी वाचा-ऐन निवडणूकीच्या धामधूमीत तीन बोकड, शेळी चोरीला… ज्येष्ठ महिलेची पोलीस ठाण्यात धाव

आरोपीने शुश्रूषा करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची छायाचित्रे मोबाइलवर काढली. छायाचित्रे, तसेच चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली. तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या मोबाइलवर चित्रफीत पाठविण्यची धमकी देऊन त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपी पवारविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.