नारायणगाव : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष रमेश विश्वनाथ भुजबळ यांच्या डिलीशस उपाहारगृहासाठी ६७ हजार ६७० रुपये किमतीची वीजचोरी केल्याप्रकरणी भुजबळ यांचा मुलगा गौतम रमेश भुजबळ याच्याविरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
गौतम रमेश भुजबळ (रा. वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर) याच्याविरोधात भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे नारायणगाव शहराचे सहाय्यक अभियंता ऋषिकेश सुदाम बनसोडे यांनी वीजचोरीची फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> पुणे :अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी २ लाख ४० हजार उमेदवारांची नोंदणी
सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहिती नुसार , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नारायणगाव शहरचे सहाय्यक अभियंता ऋषिकेश सुदाम बनसोडे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ रामदास बांबळे यांनी २९ मार्च २०२२ रोजी उपाहारगृहामध्ये जाऊन मीटर तपासणी केली. त्यावेळी विजेचा अवैध वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. वीज वापरदार गौतम रमेश भुजबळ यांनी मागील वर्षभरात ३५०१ युनिट्सची वीजचोरी केली असून महावितरण कंपनीचे ६७ हजार ६७० रुपयेचे आर्थिक नुकसान केले असल्याचे निष्पन्न झाले. या वीजचोरीच्या बिलाची तडजोड रक्कम म्हणून २० हजार रुपये होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे . गौतम भुजबळ हा पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष तसेच वारूळवाडी येथील भागेश्वर दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रमेश विश्वनाथ भुजबळ यांचा मुलगा आहे.