लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : कल्याणीनगर येथे झालल्या दुर्घटनेनंतर पोलिसांना पब आणि बारचालकांसाठी असलेल्या नियमावलीची आठवण झाली आहे. नियमावलीत शिथिलता खपवून घेतली जाणार नाही, असा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही पब आणि बार वेळेत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

अमितेश कुमार यांनी फेब्रुवारी महिन्यात पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. शहरात मध्यरात्रीनंतर सुरू असलेल्या पबबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रारी आल्या होत्या. मुंढवा, कोरेगाव पार्क, बाणेर भागातील हायस्ट्रीट परिसरात पहाटेपर्यंत सुरू असलेल्या गोंधळामुळे स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी शहरातील पब, बार, रेस्टॉरंटविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. रात्री साडेबाराच्या आत पब, बार बंद करण्याचे आदेश देण्यात आले. कारवाई न झाल्यास संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

आणखी वाचा-पुणे : मुसळधार पावसामुळे २५ ठिकाणी झाडे कोसळली

पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. नियमांचे पालन करून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, तसेच पोलिसांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी रात्री दीडपर्यंत पब, बार, रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास सुरुवात केली.

दरम्यान, कल्याणीनगरमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वेळेचे पालन न करणाऱ्या पब, हॉटेल, रेस्टॉरंट चालकांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत.

आणखी वाचा-पुण्यातील पोर्श गाडी अपघात प्रकरणाची देवेंद्र फडणवीसांकडून दखल; कठोर कारवाईचे दिले आदेश

पब, रेस्टॉरंटसाठी नियमावली

  • रात्री दीडपर्यंत परवानगी
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी
  • पब, रेस्टॉरंट बंद झाल्यानंतर भटारखान्याची साफसफाई करण्यास वेळ
  • पबच्या बाहेर गोंधळ, गैरवर्तन झाल्यास कारवाई
  • वाहतुकीस अडथळा होता कामा नये
  • नागरिकांची तक्रार आल्यास कारवाई
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police reminded of pub rules after tragedy police commissioners order to close pubs and bars on time pune print news rbk 25 mrj