टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना काही दिवसांपूर्वी अटक केली. यानंतर अनेक बड्या व्यक्तींना अटक करण्यात आली. त्याच दरम्यान जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक अश्विन कुमार यालाही बंगळुरू येथून अटक करण्यात आली. आता याच अश्विन कुमारच्या घराची झडती घेण्यात आली. या कारवाईत त्याच्या घरात सोने, चांदी, हिरे, जडजवाहीर असा एकूण १ कोटी १ लाख ९५ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात सोन्याचे ३९ दागिणे, चांदीचे एकूण १६ दागिण्यांचा समावेश आहे. सोने एकूण १४८०.६८० ग्रॅम, हिरे, जडजवाहीर ४४.७४ कॅरेट सोन्याची दागिने (हिरे रत्नासह) यांची किंमत ८५,२०,३२६ रुपये आहे. याशिवाय चांदीचं एकूण वजन २७.०२३ किलो असून त्याची किंमत १६ लाख ७५ हजार ४७९ रुपये आहे. असा एकूण १ कोटी १ लाख ९५ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तुकाराम सुपेंच्या नातेवाईकांकडून २ दिवसात ५८ लाख रुपये पोलिसांकडे सुपुर्द

दरम्यान, तुकाराम सुपे यांच्या घरी पोलिसांनी दोन वेळा धाडी टाकल्या. यात आतापर्यंत सोने आणि रोख रक्कम असा जवळपास ३ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. पोलिसांच्या या कारवाईनंतर सुपे याचे नातेवाईक आणि जवळचे व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आहेत. असं असताना सुपेंच्या जवळच्या २ व्यक्तींनी मागील दोन दिवसात ५८ लाख रुपये स्वतः पुणे सायबर विभागाकडे आणून दिले आहेत. यात गुरुवारी (२३ डिसेंबर) २५ लाख आणि आज (२४ डिसेंबर) ३३ लाख रुपये जमा केले.

राज्यात मागील महिन्याभरात आरोग्य भरती, म्हाडा भरती या परीक्षांमध्ये पेपर फुटीमुळे खळबळ उडाली होती. त्याच दरम्यान आणखी एक प्रकरण समोर आले. त्यामध्ये राज्य परीक्षा आयोगाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने सुपे यांना चौकशीसाठी बोलवलं.

“आतापर्यंत ३ कोटींची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त”

चौकशीत सुपेंनी परीक्षेत गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या आणि नातेवाईकांच्या घरी दोन वेळा धाडी टाकण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल ३ कोटींच्या आसपास रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आढळून आले. यामुळे या गैरव्यवहारामध्ये आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

पुणे पोलिसांकडून अटकसत्र सुरूच

दरम्यान, राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष, उच्च आणि माध्यमिक औरंगाबाद विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरेसह, बंगलोर येथून जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक अश्विन कुमार या दोघांना यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक सौरभ त्रिपाठीला देखील अटक करण्यात आली.

हेही वाचा : पेपरफुटीचे धागेदोरे नागपूरपर्यंत, सीबीआयकडे देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? मलिकांचा फडणवीसांना सवाल

या सर्व घडामोडी घडत असताना तुकाराम सुपे याच्या जवळच्या दोन नातेवाईकांनी मागील २ दिवसात ५८ लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडे आणून दिली आहे. यामुळे आता आणखी किती लोकांकडे सुपे याने पैसे दिले होते आणि या प्रकरणात कोण कोण बडे अधिकारी आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police seized gold silver diamonds of more than 1 crore rupees in tet exam leak case pbs
Show comments