लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : उद्योगस्नेही वातावरण निर्मिती व उद्योजकांच्या अडीअडचणींवर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत आता औद्योगिक तक्रार निवारण पथकाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे प्रमुख सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात लवकरच इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाअंतर्गत सुमारे ४० ते ४५ लाख इतकी लोकसंख्या आहे. आळंदी- मरकळ, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्र आयुक्तालयाच्या अखत्यारीत येतात. या ठिकाणी सुमारे दोन हजार छोट्या आणि तीनशे ते चारशे मोठ्या कंपन्या आहेत. उद्योगांना भयमुक्त वातावरण मिळावे, यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी २१ मार्च २०२३ रोजी औद्योगिक तक्रार निवारण पथकाची स्थापना केली होती. या अगोदर खंडणी विरोधी पथकांतर्गत औद्योगिक तक्रार निवारण पथकाचे कामकाज सुरू होते. या कक्षाचे प्रमुख पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी होते. दोन पथकाचे एकत्र कामकाज असल्याने कोणत्यातरी एका पथकासाठी पूर्ण वेळ देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील तक्रार निवारणासाठी पथकाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे.

आणखी वाचा-हिंजवडी ‘आयटी पार्क’मध्ये पोलीस मदत केंद्र, तरुणींच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार

या औद्योगिक पथकाचे कार्यक्षेत्र पिंपरी-चिंचवड आयुक्तालय असून, औद्योगिक आस्थापना संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांचा तपास या पथकाकडून केला जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रात खंडणी मागणे, अशांतता माजवणे यासारखे गुन्हे होणार नाहीत, याबाबत पथकाकडून प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. औद्योगिक तक्रार निवारण पथकाच्या प्रमुखांना गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तामार्फत पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करावा लागणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police set up industrial grievance redressal team in industrial area of primpri chinchwad pune print news ggy 03 mrj