पिंपरी : ‘तीर्थक्षेत्र आळंदी, देहूमधून वाहणारी इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याची जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दिली होती. नदी स्वच्छतेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच अहवाल तयार होऊन कामाला सुरुवात होईल. इंद्रायणी नदी  मोकळा श्वास घेईल’, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. तसेच महिला, मुलींच्या छेडछाडीच्या घटनांबाबत पोलिसांनी जहाल धोरण स्वीकारावे, असेही ते म्हणाले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मवर्षानिमित्त (७५० वर्षे) ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी  सामंत यांच्या हस्ते झाले. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन समाधी मंदिरात हा सोहळा पार पडला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजन, भावार्थ देखणे, राजेंद्र उमाप यावेळी उपस्थित होते.

‘इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या प्रकल्पात पर्यावरण विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पुणे  महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए),  पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिकेचा सहभाग आहे. अडीच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असल्याचे’ सांगून मंत्री सामंत म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या भवनासाठी पहिल्या टप्प्यात १२ ते १५ कोटी लागणार आहेत. हा निधी शासन देईल. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरित्रावर अभ्यासक्रम तयार होत आहे. त्याच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची संधी मिळाल्याने मी भाग्यवान समजतो. वारकरी संप्रदायाला आवश्यक असलेली मदत शासनाकडून केली जाईल’.

पोलिसांनी जहाल धोरण स्वीकारावे

‘जळगाव येथे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी तसेच राज्याच्या इतर भागात अशा घटना घडत असतील तर पोलिसांनी कडक कारवाई करावी. पोलिसांनी मवाळ धोरण सोडून जहाल धोरण स्वीकारावे. अशा प्रवृत्तीला ठेचून काढावे’, असे सामंत म्हणाले.

Story img Loader