पुणे: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे हे महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असतात. त्यामुळे २ आणि ३ सप्टेंबर रोजी हडपसर येथे संभाजी भिडे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमाला उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत पुणे पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारावी. अन्यथा आम्ही आंदोलन करणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते गौरव जाधव आणि भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष दत्ता पोळ यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी दोन महिन्यापूर्वी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याची घटना घडली. यावरून राज्यभरात आंदोलन करण्यात आली.त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.त्यामुळे जनतेमध्ये तीव्र भावना आहेत.आता त्याच दरम्यान पुण्यातील मांजरी येथे २ सप्टेंबर रोजी संभाजी भिडे बैठक होणार आहे.तर दुसर्‍या दिवशी ३ सप्टेंबर रोजी उरुळी देवाची येथे संभाजी भिडे नागरिकांना मार्गदर्शन करणार आहे.

आणखी वाचा-पुणे: क्षेत्रभेटीच्या खर्चाचा भार विद्यार्थ्यांच्या खिशावर

तर आजपर्यंत संभाजी भिडे यांनी प्रत्येक कार्यक्रमात समाजात तेढ निर्माण करणारी विधान केली आहेत. या सर्व घटना लक्षात घेऊन,हडपसर येथे होणार्‍या कार्यक्रमामध्ये देखील वादग्रस्त विधान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांच्या हडपसर भागात होणार्‍या कार्यक्रमाला उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत परवानगी नाकारावी, अशी आमची मागणी असून जर पुणे पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याची भूमिका आज पुण्यात विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकार घेऊन मांडली.

Story img Loader