पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील फौजदार ऑनलाइन जुगार (गेमिंग) खेळत असल्याचे समोर आले आहे. या फौजदाराने कर्तव्यावर असताना क्रिकेटच्या ड्रीम ११ मध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. सोमनाथ झेंडे असे कोट्यधीश झालेल्या फौजदाराचे नाव आहे. दरम्यान, ऑनलाइन जुगार खेळणे फौजदाराचा अंगलट येण्याची शक्यता असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झेंडे हे पोलीस आयुक्तालयातील मुख्यालयात कार्यरत असतात. सध्या क्रिकेट विश्वचषक सामने सुरू आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून झेंडे यांनी ड्रीम ११ वर ऑनलाइन गेम खेळण्यास सुरूवात केली होती. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर टीम लावली होती. त्यांचा संघ (टीम) जिंकला. त्यामुळे त्यांना दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. दरम्यान, झेंडे यांना ऑनलाइन जुगार अंगलट येण्याची शक्यता आहे. झेंडे हे कर्तव्यावर असताना जुगार खेळतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

हेही वाचा >>>ललित पाटील प्रकरण : भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघा आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

मी तीन महिन्यांपासून ऑनलाइन गेम खेळायला लागलो. आतापर्यंत केवळ सहा सामने लावले. सहाव्या सामन्यातच मला दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. या पैशातून सदनिकेचे कर्ज, उर्वरित देणे पूर्ण करणार आहे. त्यामुळे डोक्यावरील आर्थिक ओझे कमी होईल. मला जास्त आवड नव्हती. पण, सहजच सामना लावला आणि मी जिंकलो. ही गेम आर्थिक जोखमीची असल्याचेही फौजदार झेंडे म्हणाले.

ऑनलाइन जुगारापासून तरुण पिढीला वाचविण्यासाठी शासनाकडून उपक्रम राबविले जात असताना फौजदार सोमनाथ झेंडे हे कर्तव्यावर जुगार खेळले. त्यातून त्यांना काही रक्कम मिळाली. त्याचा गाजावाजा करून त्यांनी ऑनलाइन जुगाराला चालना देण्याचे काम केले आहे. यातून लहान मुलांना ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.- अमोल थोरात माजी सरचिटणीस भाजप

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police somnath jhende in pimpri became millionaires from online gambling pune print news ggy 03 amy