आरोपीकडून ५० हजार रुपये घेणाऱ्या अलंकार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी दिले. अरविंद शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अरविंद शिंदे हे डहाणूकर कॉलनी पोलीस चौकीत नियुक्तीस आहेत.
हेही वाचा >>> २०२४ मध्ये चिंचवडला राष्ट्रवादीचा आमदार असणार; आभार मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निर्धार
घराच्या मालकी हक्कावरुन एरंडवणे भागातील अलंकार पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल आहेत. या गुन्ह्याचा तपास शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला नव्हता. मात्र, शिंदे यांनी या प्रकरणातील आरोपीला मोबाइलवर संदेश पाठवून पोलीस चौकीत बोलावून घेतले. आरोपीला अटक करण्याची भीती घालून शिंदे यांनी त्याच्याकडून ५० हजार रुपये घेतले. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदे यांची चौकशी केली. चौकशीत तथ्य आढळल्याने शिंदे यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यााचे आदेश देण्यात आले.