वाकड येथील ३० फूट उंच असलेल्या उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धास झेलून पोलिसांनी प्राण वाचविले. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
बाळासाहेब अर्जुन वाकडकर (रा. वाकड) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडकर हे सकाळी साडेनऊच्या सुमारास वाकड उड्डाणपुलावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करीत होते. त्या वेळी वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सी. व्ही. केंद्रे हे तेथून जात असताना त्यांचे लक्ष गेले. बाळासाहेब वाकडकर हे पुलाच्या कठडय़ावर जवळपास १० ते १५ मिनिटे थांबून होते. या वेळी केंद्रे यांनी सावधगिरी म्हणून द्रुतगती महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवून ठेवली होती. केंद्रे यांनी १० मिनिटे वाकडकर यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाकडकर ऐकण्याच्या मन:स्थितीमध्ये नव्हते.
दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याने उड्डाणपुलावर जाऊन आत्महत्येच्या विचारामध्ये असलेल्या वाकडकर यांना परावृत्त करण्याच्या उद्देशातून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाकडकर यांनी खाली उडी मारली. त्याच वेळी खाली उभे असलेल्या केंद्रे आणि त्यांच्या सोबतचे पोलीस कर्मचारी कांबळे यांनी अलगद झेलून वाकडकर यांचे प्राण वाचविण्यात यश संपादन केले. यामध्ये वाकडकर यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, वाकडकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे नेमके कारण समजले नाही. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Story img Loader