पिंपरी : अवैध सावकारीच्या त्रासातून कर्जदाराने जीवन संपविल्याच्या शहरात पंधरा दिवसांत दोन घटना घडल्याने पोलिसांनी अवैध सावकारी विरोधात कडक पाऊल उचलले आहे. अवैधरीत्या सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे.
खासगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून वडिलांनी दहा वर्षांच्या मुलाचा खून केला. त्यानंतर दाम्पत्याने गळफास लावून घेतला. त्यात आईचा मृत्यू झाला; तर वडील बचावले. ही घटना चिखली येथील सोनवणे वस्ती येथे घडली. अशीच घटना तीन जानेवारीला चिंचवड स्टेशन येथे घडली. सावकाराच्या जाचाने रिक्षाचालक राजू राजभर याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पंधरा दिवसांत या दोन घटना घडल्या.
हेही वाचा >>> बारामती स्वतंत्र जिल्हा निर्मितीची अफवा; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध सावकारीची काही प्रकरणे निदर्शनास येत असल्याने अशा गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. अवैध सावकारी संदर्भात नागरिकांनी तक्रारी देण्यास पुढे यावे. यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. नागरिकांकडून भरमसाट व्याजाने पैसे उकळणारे, नागरिकांना छळ आणि धमक्या देणाऱ्या सावकारांविरुद्ध तत्काळ कठोर कार्यवाही करण्याचा आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
हेही वाचा >>> शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
कठोर शिक्षेची तरतूद
अवैध सावकारी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी, त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करुन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक आणि जरब बसविणाऱ्या तरतुदी असणारा विशेष कायदा महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ हा अंमलात आणला आहे. या कायद्यांतर्गत कठोर शिक्षेची तरतूद आहे. अवैध सावकारी किंवा भरमसाठ व्याज आकारणी करून कोणी फसवणूक करत असेल. तसेच तक्रारदारास धमक्या किंवा छळाचा धोका असल्यास संबंधितांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अवैध सावकारी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला.