पुणे आणि पिंपरी-चिंचवड या राज्यातील सर्वात मोठय़ा महानगरपालिका असलेल्या शहरात एकाही सिग्नलला वीज गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोडशेडिंगच्या दिवशी शहरातील वाहतूक सुरळित ठेवण्यास वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. महापालिकांकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे प्रत्येक गुरुवारी लाखो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे आणि िपपरी-चिंचवड शहरात एकूण २९४ वाहतुकीचे सिग्नल आहेत. त्यापैकी सध्या २८० सिग्नल हे चालू आहेत. यापैकी एकाही सिग्नलवर वीज गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था केलेली नाही. पुणे शहरात गुरुवार हा लोडशेडिंगचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यासाठी अगोदरच्या दिवशीच सर्व नियोजन करून सिग्नलनुसार त्या ठिकाणी कर्मचारी दिले जातात. पण, कधी-कधी गुरुवार व्यतिरिक्त देखील वीज गायब होते. त्यावेळी मात्र, सिग्नल बंद पडतो आणि वाहतूक कोंडी होऊन जाते. ती पूर्ववत करण्यास पोलिसांना एक ते दोन तास मेहनत घ्यावी लागते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या राज्यातील सर्वात उत्पन्नाच्या महापालिका समजल्या जातात. त्याबरोबर शिक्षणाचे शहर, आयटी हब अशी या शहराची ओळख आहे. या शहरातील वाहतूक ही सर्वात महत्त्वाची समस्या मानली जाते. मात्र, महापालिकेडून आतापर्यंत सिग्नलवरील वीज गेल्यास त्याची पर्यायी व्यवस्था करणे त्यांना अद्याप जमलेले नाही. वाहतूक शाखेकडून याबाबत महापालिकेला अनेक वेळा कळविण्यात आले आहे. मात्र, त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी विजेचे लोडशेडिंग असल्याचे गृहित धरूनच नियोजन केले जाते. वीज गेल्यानंतर चौकातील वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यास मोठा त्रास होतो. त्यामुळे चौकानुसार गुरुवारी त्या ठिकाणी एक ते चार कर्मचारी नेमले जातात. सध्या शहरातील तीन महत्त्वाचे सिग्नलवर इन्व्हर्टरद्वारे विजेची पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. त्याला काही खासगी कंपन्यांनी मदत केली आहे. त्यामध्ये विद्यापीठ चौक, शाहीर अमर शेख चौक यांचा समावेश आहे. गुरुवारबरोबरच आठवडय़ात अनेक वेळा वीज गेल्यामुळे सिग्नल बंद होतात. वीज कंपनीकडून वाहतूक पोलिसांना याबाबत अगोदर पूर्वकल्पना दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, अशा प्रकारची कोणतीही माहिती दिली जात नाही.
गुरुवार.. वाहतूक पोलिसांच्या कसरतीचा दिवस!
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या राज्यातील सर्वात मोठय़ा महानगरपालिका असलेल्या शहरात एकाही सिग्नलला वीज गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही.
First published on: 04-03-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police traffic signal load shedding