पुण्यातील मगरपट्टा हडपसर येथे सासूच्या छळास कंटाळून पोलिसाच्या पत्नीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा हडपसर पोलीस तपास करीत असून जान्हवी अमित कांबळे आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत.
जान्हवी कांबळे या हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमित कांबळे यांच्या पत्नी होत्या. अमित हे हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकात (डीबी) कार्यरत आहेत. अमित आणि जान्हवी या दाम्पत्याला शिवम (दोन वर्ष) हा मुलगा आहे. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास जान्हवी यांनी राहत्या घरी बेडरुममध्ये मुलाची हत्या करुन आत्महत्या केल्याचे उघड झाले.
आत्महत्येपूर्वी जान्हवी यांनी पतीला उद्देशून चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात त्यांनी म्हटले होते की, ‘अमित तू माझ्यावर प्रेम करतो, पण मला वेळ देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. सासू सुजाता ही माझा छळ करते.’ पोलिसांनी आता या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे.