पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३९ वा पालखी सोहळा उद्या पार पडत आहे. या निमित्ताने पिंपरी- चिंचवड पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देहू आणि आळंदीत संस्थानाला भेट दिली. तुकोबा आणि माऊलींच दर्शन देखील घेतलं. सुरक्षेबाबत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याबाबत त्यांनी स्वतः जाऊन पाहणी केली.
देहूत उद्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल होत असतात. उद्याही वारकऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देहूत मोठा पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. आज पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी स्वतः देहूत जाऊन सुरक्षेबाबत आढावा घेतला. देवस्थानच्या विश्वस्तांची संवाद साधला. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, माधुरी कांगणे, बापू बांगर, डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सचिन हिरे राजेंद्रसिंग गौर, देविदास देवारे आदी उपस्थित होते.
आणखी वाचा-आदिवासी विभागातील पदभरती प्रक्रिया स्थगित… झाले काय?
दरवर्षी देहू आणि आळंदीत पालखी सोहळ्यात चोरटे सक्रिय असतात. ग्रामीण भागातून आलेल्या वारकऱ्यांना याचा फटका बसू शकतो, हे लक्षात घेऊन देहू आणि आळंदीत ठिकठिकाणी सीसीटीव्ही तसेच पोलीस हे वारकऱ्यांच्या वेशभूषेत, खाकी गर्दीत फिरणार आहेत. यामुळे चोरीच प्रमाण कमी होऊ शकतं. पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचं रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वॉचर बनून नजर ठेवणार आहेत. चोरट्यांची नजर ही भाविकांच्या मोबाईल, रोख रक्कम, दागिन्यांवर असते. त्यामुळे वारकऱ्यांनी आणि भाविकांनी सतत सतर्क राहण्याची गरज आहे.
© The Indian Express (P) Ltd