शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर येथे घडली. हवालदार सुनील नारायण शिंदे (वय ५०, रा. गल्ली क्र. एक गणराजपार्क, कवडी माळवाडी कदमवस्ती ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. या घटनेचे कारण पोलिसांना समजू शकलेले नाही. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार पदावर काम करीत होते. बुधवारी रात्री ते खोलीत झोपण्यास गेले. गुरुवारी सकाळी अकरानंतरही ते बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलाने दरवाजा वाजवला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने बाजूच्या खिडकीतून पाहिल्यावर वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.
सुनेच्या आत्महत्याप्रकरणी शिंदे आणि कुटुंबीयांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी बुधवारी न्यायालयात सुनावणी होती. यामध्ये दाखल झालेल्या आरोपपत्राच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.