लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : नाट्यगृहांमध्ये चित्रपट दाखवण्यासंदर्भात सरकारने तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल लवकरच येणार आहे. याच अनुषंगाने राज्य सरकारचा चित्रपताका हा महोत्सव मुंबईतील रवींद्र नाट्यगृहात होणार आहे. त्यामुळे समितीचा अहवाल आल्यानंतर धोरण ठरवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठात झालेल्या ‘स्टार्टअप एक्स्पो’ या कार्यक्रमानंतर ॲड. शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठी चित्रपटांना बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये पडदा न मिळणे, बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये वाढलेले तिकीटदर, एकपडदा चित्रपटगृहांच्या अडचणी या पार्श्वभूमीवर राज्यभरात असलेल्या नाट्यगृहांमध्ये चित्रपट दाखवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
त्यानुसार पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात चित्रपट महोत्सव, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मराठी चित्रपटाचा खेळ, तर द बॉक्स या छोटेखानी नाट्यगृहात काही मराठी चित्रपटांचे खेळ झाले होते. नाट्यगृहात चित्रपट दाखवण्याच्या कल्पनेबाबत चित्रपट-नाट्यसृष्टीतून मतमतांतरे व्यक्त केली आहेत. या पार्श्वभूमीवर, नाट्यगृहांमध्ये चित्रपट दाखवण्यासंदर्भात समिती नियुक्त केल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.
राज्य सरकार कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत स्वतंत्र धोरण करत असल्याची माहितीही ॲड. शेलार यांनी दिली. ‘शिक्षण, उद्योगांसोबत विविध क्षेत्रांमध्ये वाढता वापर लक्षात घेऊन राज्य सरकार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंदर्भात स्वतंत्र धोरण राज्य सरकारकडून येत्या काळात जाहीर केले जाणार आहे. या धोरणासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये एआयचा वापर करून कामामध्ये त्याचा फायदा होण्याच्या दृष्टीने समिती काम करत आहे. तसेच शिक्षण, सायबर गुन्हेगारी अशा विषयांचाही त्यात विचार करण्यात आला आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर एक मसुदा तयार प्रसिद्ध करून त्यावर तज्ज्ञ आणि नागरिकांकडून हरकती-सूचना मागवल्या जातील. त्यानंतर धोरण तयार करण्यात येईल,’ असे शेलार यांनी सांगितले.