अपक्ष आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांना महापौरपद व दुसरे आमदार अण्णा बनसोडे यांचे समर्थक राजू मिसाळ यांना उपमहापौरपद दिल्यानंतर शहरातील तिसरे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या परिवारातील सदस्य नवनाथ जगताप यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, स्थायी अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार महेश लांडगे यांना प्रतीक्षेत ठेवून आगामी काळात वेगळी खेळी खेळण्याचे संकेतही अजितदादांनी दिले आहेत.
आगामी लोकसभा व त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुका अजितदादांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. राष्ट्रवादीचे १०० आमदार निवडून आणण्याचे  ‘टार्गेट’ असलेल्या अजितदादांना बालेकिल्ल्यातील तीनही मतदारसंघांतून राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा निवडून आणायचे आहेत. त्यादृष्टीने त्यांचे नियोजन सुरू आहे. पहिल्या वर्षी लांडे व बनसोडेंची मागणी पूर्ण करणाऱ्या अजितदादांनी जगतापांची शिफारस अमान्य केल्याने ते बरेच नाराज झाले होते. जगदीश शेट्टी यांना संधी देतानाच पुढील वर्षी नवनाथ जगतापांना संधी देऊ, असा शब्द अजितदादांनी दिला होता. मात्र, लांडगेंची स्थायी समितीवर वर्णी लागल्याने चुरस निर्माण झाली होती. लांडगे हे आमदार लांडे यांचे जवळचे नातेवाईक आहेत. मात्र, त्यांना ताकद देणे अथवा डावलणे या दोन्ही गोष्टी लांडेंना त्रासदायक ठरतात. त्यामुळे लांडे यांची भूमिका शेवटपर्यंत गुलदस्त्यात होती. पुढील धोका ओळखून लांडगे यांची शिफारस त्यांनी केलीच नसल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी जगताप यांनी प्रतिष्ठा पणाला लावून स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळवून दिले.
जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून अविनाश टेकवडे यांच्याकडे पाहिले जाते. आतापर्यंत मंत्रिमहोदयांची कृपादृष्टी टेकवडे यांना सातत्याने लाभली आहे. आताही टेकवडेंनी अजितदादांकडे शिफारस करण्याचे साकडे त्यांना घातले. अजितदादांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अन्य कोणी हस्तक्षेप केल्याचे आवडत नाही. त्यामुळेच तटकरेंनी सावध भूमिका घेतच अजितदादांचा कल जाणून घेतला होता. टेकवडे यांच्या शिफारसीसाठी राष्ट्रवादीबरोबरच मनसे व भाजपचे नगरसेवकही होते, हे विशेष. या सगळ्या गदारोळात राष्ट्रवादीचेच नगरसेवक विलास नांदगुडे यांनी गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकास पद देऊ, अशी मागणी करून ‘घरचा आहेर’ दिलाच, सर्वाचे लक्षही वेधून घेतले. त्यांनी अचूक वेळ साधून केलेली पत्रकबाजी पाहता त्यांचा ‘बोलविता धनी’ वेगळाच होता, हे उघड गुपित होते. मग, तो पक्षातील होता की विरोधकांपैकी, एवढाच मुद्दा होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political balance by ajit pawar
Show comments