आयुष्यभर संघर्ष करणारे गोपीनाथ मुंडे हे खऱ्या अर्थाने लोकमान्य व राजमान्य लोकनेते होते, विकासाची दृष्टी असलेल्या व राजकारणापलीकडे मैत्री जपणाऱ्या मुंडे यांनी, रडायचे नाही तर लढायचे असा कानमंत्रच दिला होता, अशा शब्दात प्रसिध्द व्याख्याते नितीन बानगुडे यांनी मुंडे यांना आदरांजली वाहिली. माणसे यशाने नव्हे तर अपयशाने मोठी होतात, हे मुंडे यांच्याकडे पाहिल्यानंतर जाणवायचे, असेही ते म्हणाले.
िपपरी-चिंचवड शहर भाजपने मुंडे यांच्या स्मरणार्थ ‘महाराष्ट्राला वळण देणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे’ या विषयावर बानगुडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते, तेव्हा ते बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, शहराध्यक्ष सदाशिव खाडे, अमर साबळे, प्रा. दादासाहेब मुंडे, संपर्कप्रमुख एकनाथ पवार, सरचिटणीस राजू दुर्गे, अमोल थोरात, मोरेश्वर शेडगे, नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, केशव घोळवे आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. पावसामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती व अडथळ्यांच्या शर्यतीतही शेवटपर्यंत थांबून नागरिकांनी बानुगडे यांचे व्याख्यान ऐकले.
बानगुडे म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासाचे मुंडे यांचे स्वप्न होते. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांना ग्रामविकास खातेच मिळाले. मात्र, नियतीला ते मंजूर नव्हते म्हणून खात्याचा कारभार सांभाळण्याची संधीही त्यांना मिळू शकली नाही. शेतकरी, ऊस कामगारांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. माणसातील माणुसकी जपणाऱ्या मुंडे यांच्या विचारांना चालना देणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरणार आहे.

Story img Loader