अजून आठवते.. शंकरराव निम्हण

आम्ही पाच भाऊ. त्यातील दोघे राजकारणात. पाषाण येथील प्रभाग क्रमांक सहामधून १९७४ ला निवडणूक कोणी लढवायची यावरून त्यांच्यात एकमत होईना. शेवटी चिठ्ठी टाकायची आणि त्यामध्ये ज्याचे नाव येईल त्याने निवडणूक लढवायची असे ठरले. मी सहज माझ्याही नावाची चिठ्ठी टाका असे सांगितले आणि चिठ्ठीमध्ये चक्क माझे नाव निघाले आणि अपक्ष निवडणूक लढवून नगरसेवक झालो. अशा प्रकारे माझा राजकारणाचा श्रीगणेशा झाला.

१९७४ मध्ये मी पहिल्यांदा निवडणूक लढविली तेव्हा माझ्या विरोधात सात उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी चार भावकीतील निम्हण आणि बाकी तीन अपक्ष होते. तरीही मी पहिल्याच प्रयत्नांमध्ये निवडून आलो. जवाहरनगर सोसायटी येथील मतदारांनी एकगठ्ठा मतदान माझ्या विरोधातील उमेदवाराला केले होते. तरीही पाच वर्षे मी त्या भागातील विकासकामे केली. त्यानंतर १९७९ साली मी पुन्हा निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा सोसायटीमधील अनेकांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता माझा प्रचार केला. मला एकगठ्ठा मतदान केले आणि मी निवडून आलो. याच दरम्यान रेकांडो कंपनीच्या सहकार्याने महापालिकेने शहरात औंध रस्ता, सेव्हन लव्हज चौक, जंगली महाराज रस्ता आणि विद्यापीठ असे चार रस्ते तयार केले. त्यातील एक माझ्या वॉर्डात होता. हा रस्ता एवढा उत्कृष्ट होता की २००८ पर्यंत या रस्त्यावर एकही खड्डा नव्हता.

१९७८ साली उपमहापौरपदासाठी गजानन जाधव, मोतीलाल परदेशी आणि मी असे तीन उमेदवार उभे होतो आणि चार मतांनी मी निवडून आलो. १८ जुलै १९७८ साली पाषाणला छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा केला. पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना निमंत्रित केले होते आणि तेव्हा शिवाजीराव भोसले पुण्याचे महापौर होते. अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शिवाजीराव भोसले यांनी महापौर शिवाजीराव भोसले यांच्या उपस्थितीत केले. हा माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण होता असे मी मानतो.

८५-८६ साली स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आलो. त्या वेळी संपूर्ण शहरात पन्नास बालवाडय़ा सुरू केल्या. त्यातील आठ माझ्या वॉर्डामध्ये होत्या. वास्तविक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी माझे उत्तम संबंध आहेत. मी राजकारणातच राहिलो असतो तर मला नक्कीच आणखी मोठी संधी मिळाली असती. परंतु राजकारण आपले क्षेत्र नाही हे ओळखून १९९४ साली माझा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यानंतर मी राजकारणाला कायमचा रामराम केला. २००१ पासून मी बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे.

(शब्दांकन : प्रथमेश गोडबोले)

 

Story img Loader