‘‘आपल्याकडे अर्थकारण समजून घेण्यास फारसे महत्त्व दिले जात नाही. मात्र ‘बाजारपेठेचे नियंत्रण कोणाकडे’ या एकाच मुद्दय़ावर जग चालते. त्यामुळे प्रत्येक राजकीय निर्णयाची आर्थिक पातळीवर चिरफाड करणे आणि अर्थकारणाचे धागेदोरे समजावून घेणे महत्त्वाचे आहे,’’ असे मत ‘लोकसत्ता’ चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.
सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील प्राचार्य सोनोपंत दांडेकर अध्यासनातर्फे ‘जागतिक अर्थकारण आणि नैतिकता’ या विषयावर कुबेर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ या वेळी उपस्थित होते.
कुबेर म्हणाले, ‘‘जागतिक अर्थकारणात नैतिकतेने अर्थकारणाचे बोट सोडले आहे. समाजाला वास्तवाचे भानच येऊ नये या उद्देशाने त्यांना नैतिकतेच्या पातळीवर झुलवत ठेवून अर्थकारणाचे गारुड टाकले जाते. भारताला ऐंशीच्या दशकाच्या शेवटी सोने गहाण ठेवण्याची आलेली वेळ आणि त्याच वेळी टीव्हीवर महाभारत आणि रामायण या मालिकांचा सुरू असलेला उन्माद किंवा २००७ सालचे आर्थिक संकट आणि त्याच वर्षी इंडियन प्रीमियर लीगचा झालेला उदय अशा उदाहरणांतून हे दिसून येते. असे लागेबांधे लक्षात येणे गरजेचे आहे.’’
‘‘आपली आर्थिक ताकद अबाधित राहावी यासाठी जागतिक पातळीवर ठरवून युद्धे घडविली गेल्याचे दिसून येते. दहशतवाद आणि दोन देशांतील परस्पर संघर्षांचा संबंध थेट अर्थकारणाशी असतो. जागतिक पातळीवर केवळ आर्थिक ताकदच कोणत्याही ताकदीचा मूळ गाभा ठरते. राजकारण हे अंतिमत: अर्थकारण असते. ‘बाजारपेठेचे नियंत्रण कोणाकडे’ या एकाच मुद्दय़ावर जग चालते. पण आपल्याकडे अर्थकारण समजून घेण्यास फारसे महत्त्व दिले जात नाही. प्रत्येक राजकीय निर्णयाची आर्थिक पातळीवर चिरफाड करून त्यांचे धागेदोरे समजावून घेता आले पाहिजेत,’’ असे ते म्हणाले.
या वेळी रामचंद्र गोडबोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार महाविद्यालयात वाणिज्य शाखेत तृतीय वर्षांत शिकणाऱ्या प्राची हसबनीस या विद्यार्थिनीला कुबेर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Story img Loader