शहरात सोमवारी रात्री झालेल्या अति मुसळधार पावसाने शहर पाण्यात गेल्यानंतर शहर कोणामुळे तुंबले, यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुळा-मुठा नद्यांना ५८ वेगवेगळ्या भागात मिळणाऱ्या ओढे-नाल्यांपैकी ३२ ठिकाणच्या ओढे-नाल्यांचे प्रवाह राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या पन्नास वर्षांच्या सत्ताकाळात बुजविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या गैरकारभाराची शिक्षा पुणेकरांना भोगावी लागत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या कार्यकाळात नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने होत होती. भाजपने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची किंमत पुणेकरांना मोजावी लागली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.शहरात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागातील रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले होते. वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घरांमध्ये आणि मोठमोठ्या इमारतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. झाडपडीच्याही काही घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

हेही वाचा >>>पुणे: मार्केट यार्डात मोटारीची काच फोडून लॅपटाॅप चोरला

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा मुळीक यांनी केला.महापालिका सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. तेंव्हा सत्तेत असलेल्या भाजपला बदनाम करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रशासकावर दबाव आणून पावसाळापूर्व कामे रोखून धरली. ही कामे वेळेत पूर्ण करावीत यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने वारंवार आयुक्तांच्या भेटी घेतल्या आणि सूचना केल्या. परंतु महाविकास आघाडी सरकारने केलेल्या राजकारणामुळे पुणेकरांना पूरसदृश परिस्थितीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे, असे मुळीक यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे : पावसाळी गटाराच्या क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शहर तुंबले

प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनाचा आणि नालेसफाईमध्ये हलगर्जीपणा केल्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची किंमत सर्वसामान्य पुणेकरांना मोजावी लागली आहे. गेल्या पाच वर्षात नालेसफाई न करता परस्पर देयके लाटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पाच वर्षात आंबील ओढ्याला आलेला पूर, कात्रज तलावाला आलेला पूर, यावर्षी तर पुणे शहराच्या मध्यवर्तीतील प्रत्येक रस्त्यावर आलेला पूर ही पाच वर्षांमध्ये झालेल्या अक्ष्यम चुकांची परिणीती आहे. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला जबबादार धरले जात आहे, असे जगताप यांनी सांगितले.