पिंपरी : स्थापनेपासून मंत्रिपदाची प्रतीक्षा असलेल्या पिंपरी- चिंचवड शहराला मंत्रीपदाचा दर्जा असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी उपाध्यक्षदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीकडे बहुमत असल्याने बनसोडे यांची निवड निश्चित मानली जात आहे. शहराला पहिल्यांदाच विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाले आहे. अजित पवार यांनी मंत्रीपदाऐवजी एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या शहरात उपाध्यक्ष पद दिले आहे. तर, टपरी चालक ते विधानसभा उपाध्यक्ष असा आमदार बनसोडे यांचा राजकीय प्रवास आहे.
विधानसभा उपाध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होणार असून त्यासाठी आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाली. बुधवारी नवीन उपाध्यक्षांची घोषणा होईल. उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या (अजित पवार) गटाच्या वाट्याला आले आहे. उपाध्यक्षपदासाठी पक्षात माजी मंत्री संजय बनसोडे, राजकुमार बडोले आणि अण्णा बनसोडे या तिघांच्या नावांची चर्चा होती. यापैकी पिंपरीच्या बनसोडे यांना संधी मिळाली आहे.

बनसोडे यांनी महापालिकेत तीन टर्म नगरसेवक म्हणून काम केले आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. २०१४ च्या अपवाद वगळता पिंपरी मतदारसंघाच्या निर्मितीपासून ते विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. अण्णा बनसोडे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. राजकारणात येण्यापूर्वी बनसोडे चिंचवड येथे पान टपरी चालवत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर पहाटे भाजपसोबत सत्ता स्थापन करताना आणि जुलै २०२३ मध्ये शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी होताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ते ठाम राहिले. तिसऱ्यांदा निवडून आल्याने महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल असा त्यांना विश्वास होता. परंतु, भ्रमनिरास झाला. त्यामुळे नाराज झालेले आमदार बनसोडे हे नागपूरमध्ये झालेले हिवाळी अधिवेशन सोडून मतदारसंघात आले होते. आता विधानसभेचे उपाध्यक्षपद देउन अजित पवार यांनी बनसोडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

मंत्रिमंडळाच्या शर्यतीत पिंपरी-चिंचवड शहरातील बनसोडे यांच्याबरोबरच तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार महेश लांडगे व भाजपचे शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप तसेच विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांची नावे होती. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराला ती संधी मिळाली नाही. उपाध्यक्ष पद हे मंत्री दर्जाचे पद असल्याने अप्रत्यक्षपणे मंत्री दर्जाचे पद शहराला मिळाले आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून, राजकीयदृष्ट्याही आता या शहराचा प्रभाव वाढताना दिसत आहे.

टपरी चालक ते विधानसभा उपाध्यक्ष

अण्णा बनसोडे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार आहेत

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पिंपरीचे आमदार

तिसरी टर्म; २०१४ मध्ये एकदा पराभव

पिंपरी महापालिकेत तीन वेगवेगळ्या प्रभागातून तीनवेळा नगरसेवक

महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक

बारावी पर्यंतचे शिक्षण; आयटीआयही त्यांनी केला आहे

बांधकाम व्यावसायिक

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील

मागितले मंत्रीपद मिळाले उपाध्यक्षपद

औद्याेगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील आमदाराला आत्तापर्यंत एकदाही कॅबिनेट अथवा राज्यमंत्रिपद मिळाले नाही. आत्तापर्यंत शहरातील पाच जणांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले महामंडळ मिळाले, मात्र शहराच्या ४० वर्षाच्या इतिहासात एकदाही कॅबिनेट, राज्यमंत्रिपद मिळाले नाही. मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असलेले आणि तीनवेळा निवडून आलेले भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे आणि पिंपरीचे राष्ट्रवादी (अजित पवार) अण्णा बनसोडे मंत्रिपदासाठी तीव्र इच्छुक होते. परंतु, मंत्रिपदाऐवजी आमदार बनसोडे यांना मंत्रिपदाचा दर्जा असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाले आहे.

अजितदादांचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न

एके काळी पिंपरी-चिंचवड शहराची अजित पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख होती. परंतु, त्यांच्या बालेकिल्ल्याला भाजपने २०१७ मध्ये महापालिकेतील सत्तेला सुरुंग लावला. भाजपचे विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेत दोन असे चार आमदार शहरात आहेत. राष्ट्रवादीचा एकमेव आमदार आहे. महायुतीमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार यांनी आमदार बनसोडे यांना उपाध्यक्षपद देऊन शहराला महत्त्व दिले आहे. उपाध्यक्ष पदावर बसण्याची संधी मिळाल्याने बनसोडे यांना राज्याच्या विधिमंडळात महत्त्वाची भूमिका बजावता येईल. बनसोडे यांना ताकद देऊन महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.