पुणे शहराला कचरा विल्हेवाटीचा प्रश्न भेडसावत असताना अनेक संस्था, उद्योग ही समस्या सोडवण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवक यांची राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्यामुळेच कचऱ्याचा प्रश्न जागेवरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात रोज निर्माण होत असलेल्या सुमारे १,५०० टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून महापालिकेला जागा मिळणे अपेक्षित आहे. ती प्रक्रिया लांबत चालली असून जागा मिळण्याबाबत अद्याप ठोस कृती झालेली नाही. मात्र या पाश्र्वभूमीवर हा प्रश्न सोडवण्यासाठी शहरातील अनेक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच उद्योजक पुढे आले आहेत. मात्र महापालिकेत हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन कृती करताना दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या प्रश्नाचेही महापालिकेत सध्या फक्त राजकारणच सुरू असून बैठकांशिवाय विशेष प्रगती गेल्या काही महिन्यांमध्ये झालेली नाही.
‘‘कचऱ्याच्या प्रश्नाबाबत पुणेकरांमध्ये चांगली जागृती झाली आहे. ओला-सुका या पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण करून देण्यातही पुणेकरांचे चांगले सहकार्य लाभत आहे. आता सर्व राजकीय पक्षांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी इच्छाशक्ती दाखवली, तर निश्चितपणे या प्रश्नाची सोडवणूक महापालिका व नागरिकांच्या मदतीने होऊ शकते,’’ असा विश्वास समीर रेगे यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. पुण्यातील मेलहेम आयकोस या घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशात व परदेशात काम करत असलेल्या कंपनीचे रेगे हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या कंपनीतर्फे ओल्या कचऱ्यापासून वीज आणि गॅस तयार करणारे तीनशेहून अधिक प्रकल्प देशात यशस्वी रीत्या चालवले जात आहेत. पुणे महापालिकेनेही या कंपनीला कात्रज, येरवडा, घोले रस्ता, औंध आदी ठिकाणी कचरा प्रक्रिया करण्याची कामे दिली असून या प्रकल्पांमधून तयार होणारी शेकडो वीज पथदिव्यांसाठी वापरली जात आहे. हे प्रकल्प शहरातील यशस्वी प्रकल्प म्हणून दाखवले जातात.
देशातील अनेक शहरांमध्ये यशस्वी रीत्या प्रकल्प चालवणाऱ्या रेगे यांच्या कंपनीला नाशिक महापालिकेनेही कचरा प्रक्रियेचे काम दिले आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरात सध्या जो साडेतीनशे टन कचरा तयार होतो त्या संपूर्ण कचऱ्यावर वेगवेगळे पर्याय वापरून प्रक्रिया करण्याचे काम रेगे यांच्या कंपनीने स्वीकारले आहे. त्यासाठी पुढील वीस वर्षांचा करार करण्यात आला आहे.
‘‘कचऱ्यावरील प्रक्रिया तसेच कॅपिंग, लॅन्डफिलिंग आदींसाठी अत्यंत प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. पुण्यातही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य आहे. पुणे शहराने कचरा वर्गीकरणाच्या कामात चांगली प्रगती केली आहे. मात्र कचरा प्रक्रियेसाठी वेगवेगळे उपाय वा प्रकल्प राबवून चालत नाही, तर संपूर्ण शहराचा व कचऱ्याचा विचार करून सर्व पर्यायांचा वापर करावा लागतो. तशा र्सवकष तंत्रज्ञानाचा वापर पुण्यात केला, तर येथील कचरा प्रक्रियेचा प्रश्न सुटू शकतो,’’ असा विश्वासही रेगे यांनी व्यक्त केला.

Story img Loader