पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय क्षेत्रातील ‘रणरागिणीं’मध्ये चांगलेच राजकारण रंगले आहे. सर्वाधिक घडामोडी काँग्रेसमध्ये असून राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतील महिला पदाधिकारी आम्हीही कुठे कमी नसल्याचे ‘कृतिशील कार्यक्रमा’तून दाखवून देत आहेत.
खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या महापौरपदासाठी पिंपरीत बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. अडीच वर्षांसाठी राखीव असलेले महापौरपद प्रत्येकी सव्वा वर्ष याप्रमाणे दोन जणांना संधी देण्याचे राष्ट्रवादीचे धोरण आहे. मोहिनी लांडे यांचे सव्वा वर्ष पूर्ण झाल्यानंतर झामाबाई बारणे, नंदा ताकवणे यांच्यासह अन्य इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने राष्ट्रवादीतील घडामोडींनी वेग घेतला. काहींनी अजितदादांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. मात्र, त्यांनी इच्छुकांना फारसे गांभीर्याने घेतले नाही. पक्षनेत्या मंगला कदम यांच्या पुढाकाराने व पालिकेच्या खर्चाने शाहूनगर उद्यानात नागपंचमीचा उत्सव बऱ्याच वर्षांपासून साजरा होतो. मात्र, फक्त कदमांच्याच प्रभागात नागपंचमी का, असा कांगावा अन्य नगरसेविकांनी केला, त्यावरून बरेच राजकारण झाले आणि एकेक करत नऊ वेगवेगळय़ा ठिकाणी नागपंचमी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. पालिकेची उधळपट्टी कशासाठी, असा मुद्दा काहींनी उपस्थित केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यासंदर्भात काय भूमिका घेतात, यावरच ‘नागपंचमी राजकारणाचे’ भवितव्य ठरणार आहे. शिवसेनेत सुलभा उबाळे, सीमा सावळे या ज्येष्ठ नगरसेविकांमधील शीतयुद्ध बाराही महिने सुरूच आहे. उबाळे भोसरीतून तर सावळेंना पिंपरीतून आमदार व्हायचे आहे. त्यांच्यातील सुप्त संघर्षांत दोन्ही खासदारांची कुचंबणा होते, असा शिवसैनिकांचा अनुभव आहे. भाजप शहराध्यक्षपदासाठी चर्चेत आलेल्या माजी नगरसेविका उमा खापरे यांची प्रदेशावर वर्णी लागली आहे. रिपाइं नगरसेविका व पिंपरी विधानसभेच्या दावेदार चंद्रकांता सोनकांबळे यांच्या विरोधात पक्षातच कारवाया सुरू आहेत. काँग्रेसमध्ये महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदावरून अदलाबदलीचे महानाटय़ झाले. अॅड. पद्मिनी मोहिते यांची उचलबांगडी, माजी नगरसेविका ज्योती भारती यांची नियुक्ती, भारतींना डच्चू, नीता परदेशी यांची वर्णी आणि पुन्हा ज्योती भारतींचे पद कायम, अशा चक्रावून टाकणाऱ्या घडामोडी झाल्या. या महिलानाटय़ामुळे काँग्रेस पक्षातील वातावरणच ढवळून निघाले.

Story img Loader