देशात केवळ गायीच्या दुधापासून विविध उत्पादने करणाऱ्या मोजक्याच कंपन्या आहेत. त्यामध्ये पराग मिल्क फुड्स या कंपनीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. भारतातील विविध राज्यांत कंपनीची उत्पादने विक्रीसाठी पाठवली जातात तसेच जगभरातील तब्बल ३३ देशांत कंपनीची उत्पादने निर्यात केली जातात. १९९२ मध्ये व्यवसाय सुरू केल्यानंतर प्रतिदिन
२० हजार लिटर दूध संकलन व प्रक्रिया ते प्रतिदिन २० लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याचा टप्पा कंपनीने पार केला आहे. दोन लाख शेतकरी आणि किरकोळ विक्रेते यांच्याबरोबरच कोटय़वधी ग्राहकांशी पराग फुड्सचे घट्ट नाते तयार झाले आहे.
शेतकऱ्यांशी, शेतीशी निगडित असा व्यवसाय करण्याचा वारसा शहा कुटुंबीयांना लाभला आहे. देवेंद्र शहा पशुखाद्य निर्मितीचा व्यवसाय करत असत. नव्वदचे दशक सुरू झाल्यानंतर बाजारातील दुधाची गरज ओळखून देवेंद्र, प्रीतम आणि पराग शहा यांनी मिळून १९९२ मध्ये पराग मिल्क फुड्स लि. या कंपनीची मंचर येथे स्थापना केली. सुरुवातीला देवेंद्र यांनी आपल्या दोन बंधूंसमवेत प्रतिदिन २० हजार लिटर दूध संकलन आणि संस्करण करत ‘गोवर्धन’ या नावाने या दुधाच्या विक्रीला सुरुवात केली. सुरुवातीची चारपाच वर्षे गेल्यानंतर मात्र शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणारे दुधाचे मोठे प्रमाण आणि बाजारातील मागणी यांचा ताळमेळ जुळेना. त्यामुळे १९९८ मध्ये दुधाची पावडर, लोणी, तूप अशी दुधापासून तयार होणारी अन्य उत्पादने घ्यायला सुरुवात करण्यात आली. अल्प कालावधीतच कंपनीचे गायीच्या दुधापासून तयार होणारे तूप महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात अशा तीन राज्यांत पोहोचले. २००५ मध्ये संकरीत दोन हजार गायींसह भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मची स्थापना करण्यात आली. त्यानंतर कंपनीने गायीच्या दुधापासून तयार होणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले ‘आनंदी गाय जास्त दूध देते’ या सूत्रानुसार गायींची अत्यंत काळजीपूर्वक जोपासना करण्यास सुरुवात केली. हे सुरू असतानाच चीजच्या व्यवसायात कंपनी सरस ठरत असल्याचे लक्षात आले आणि प्रतिदिन तब्बल चाळीस मेट्रिक टन चीज उत्पादनाला सुरुवात करण्यात आली. त्याला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहून कंपनीने दह्य़ासाठी ‘गो’ नावाच्या ब्रॅण्डची निर्मिती केली. त्याचे उत्पादन करून मुंबई, पुणे आणि बंगळुरु येथील बाजारात त्याची विक्री सुरू झाली. त्यानंतर चीजची सर्व उत्पादन ‘गो’ या नावाखालीच विक्री करण्यास सुरुवात करण्यात आली.
व्यवसायाचे वाढते प्रमाण पाहता मंचर येथील प्रकल्प अपुरा पडू लागला. त्यामुळे साहजिकच कंपनीने विस्तार करण्याचे ठरविले आणि दक्षिण भारतात आंध्र प्रदेश येथील चित्तुर जिल्ह्य़ात पालमनेर येथे नवा प्रकल्प सुरू केला. कंपनीची उत्पादने अद्ययावत तंत्रज्ञानानुसार घेण्यासाठी चीज उत्पादन प्रकल्प स्वयंचलित करण्यात आला. तसेच कंपनीची सर्वच उत्पादने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादित करण्यास सुरुवात करण्यात आली. २०११ मध्ये कंपनीने ‘शेत ते घर’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून ‘प्राइड ऑफ काउज’ हा ब्रॅण्ड बाजारात आणला. २०१३ मध्ये कंपनीने डेअरीमधील दुधाच्या विविध चवींच्या उत्पादनांसाठी चौथ्या ‘टॉप अप’ ब्रॅण्डची निर्मिती केली. चित्तुर येथील प्रकल्पामध्ये आधुनिक यंत्र व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टॉप अप आणि स्लर्प या ब्रॅण्डखाली उत्पादने तयार केली जाऊ लागली.
दरम्यान, कंपनीने आयडीएफसी प्रा. इक्विटी यांच्या साहाय्याने दह्य़ातील पाणी गाळणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. बिस्किट आणि केक ही बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी लागणारी दह्य़ाच्या पाण्याची पावडर तयार करण्यास सुरुवात केली. तसेच दह्य़ाचे पाणी नेसले आणि अॅबॉट या कंपन्यांना लहान बाळांचे खाद्य तयार करण्यासाठी विकण्यास सुरुवात करण्यात आली. त्याहीपुढे जाऊन कंपनीने ‘अवतार’ नावाच्या ब्रॅण्डखाली न्युट्रिशन पावडरचे उत्पादन सुरू केले आणि संपूर्ण देशभरात शंभर टक्के दह्य़ाच्या पाण्यापासून प्रथिने तयार करणारी पहिली कंपनी असा नावलौकिक प्राप्त केला.
सद्य:स्थितीत पराग फुड्सची फिलिपिन्स, दक्षिण अफ्रिका, सिंगापूर अशा विविध ३३ देशांत १६० पेक्षा जास्त उत्पादने निर्यात केली जातात. गायीच्या दुधापासून सर्व उत्पादने तयार केली जातात. तसेच कोणत्याही प्रकारच्या दुधाचे मिश्रण केले जात नाही. कंपनीच्या अवतार या ब्रॅण्डखालील ताजी व शुद्ध उत्पादने चोवीस तासांच्या आत सीलबंद करून विक्रीसाठी पाठविली जातात. ही उत्पादने शंभर टक्के शाकाहारी, ग्लुटोन, सोया व साखर विरहित असून देशातील आठ शहरांसह अॅमेझॉन संकेतस्थळावर देखील विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. कंपनीची स्थापना केल्यानंतर प्रतिदिन २० हजार लिटर दूध संकलन व प्रक्रिया केली जात असे. आता प्रकल्पांमधील आधुनिक पायाभूत सुविधांमुळे प्रतिदिन २० लाख लिटर संकलन व प्रक्रिया केली जाते. देवेंद्र शहा यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना उद्योग भूषण पुरस्काराने गौरविले आहे. पाच वर्षांपासून कंपनीचा पूर्ण कारभार अक्षाली शहा पाहतात.
देशांतर्गत डेअरी उद्योग आजही असंघटित असून या व्यवसायात मोठय़ा विस्ताराची अपेक्षा आहे. पराग फुड्स कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी बनविण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. काळानुरूप व्यवसायातील आव्हानांमध्ये बदल झाले आहेत. सध्या कोणत्याही ब्रॅण्ड झालेल्या कंपनीला आपली उत्पादने अधिक विस्तारणे, ग्राहकांसाठी अधिकाधिक उपयुक्तता देण्याची वृत्ती, सातत्याने नवे शोध, नावीन्यपूर्ण बदल घडवत राहणे आवश्यक आहे. हे सर्व बदल स्वीकारत कंपनी स्पर्धेत आपले भक्कम स्थान टिकवून आहे, असे अक्षाली सांगतात.
आम्ही आमच्या उत्पादनांचे भारतासह पाश्चिमात्य देशांमध्येही विपणन करतो. त्याकरिता छापील जाहिराती, रेडिओ अशा पारंपरिक मार्गाबरोबरच डिजिटल मार्गाचाही अवलंब केला जातो. तसेच विशेष कौशल्य असलेल्या अधिकारी व कामगारांमुळेच कंपनीने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. अशा सर्व घटकांमुळे डेअरीवर आधारित खाद्यपदार्थाच्या व्यवसायात कंपनी अग्रेसर आहे, असेही अक्षाली सांगतात.