पिंपरी : शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघांतील गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान करण्याचा निर्धार महापालिका, सोसायटी फेडरेशन आणि गृहनिर्माण संस्थांच्या समन्वय बैठकीत करण्यात आला आहे. शहरातील २५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, गृहनिर्माण संस्थांना मतदार जनजागृतीसाठी आवश्यक असलेले साहित्य महापालिका देणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी महापालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सोसायटी फेडरेशन आणि गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय बैठक पार पडली. उपायुक्त अण्णा बोदडे, मतदार नोंदणी अधिकारी पंकज पाटील, महापालिका निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, उपाध्यक्ष सुभाष कर्णिक, चिखली-मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा…महाविकास आघाडीमुळे राज्य अधोगतीला; माधव भंडारी यांचा आरोप

आगामी विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही मतदारसंघांतील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुषंगाने महापालिकेमार्फत शहरात विविध माध्यमातून अनेक ठिकाणी जाऊन मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. मतदारांच्या सोयीसाठी तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एकूण गृहनिर्माण संस्थांपैकी १५ मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये २५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये चिंचवडमध्ये १२, पिंपरीत सहा तर भोसरीत सात अशी एकूण २५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान घडवून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

गृहनिर्माण संस्थांना मतदार जनजागृतीसाठी आवश्यक असणारे साहित्य महापालिकेमार्फत पुरविण्यात येत आहे. गृहनिर्माण संस्थांनी आपल्या परिसरातील मतदार केंद्र अधिकारी यांच्या सोबत समन्वय ठेवावा. बदललेल्या मतदान केंद्रांची माहिती मतदारांना पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे निर्धारित लक्ष अधिक प्रभावीपणे साध्य होण्यास मदत होईल. तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये असलेल्या सांस्कृतिक समित्यांद्वारे मतदार जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून मतदारांना मतदान करण्याबाबत प्रवृत्त करावे, असे आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी यावेळी केले.

हेही वाचा…विद्यार्थी सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी… झाले काय, होणार काय?

सारथीवर मतदान केंद्राची माहिती

नागरिकांना आपल्या मतदान केंद्राबाबत माहिती देण्यासाठी महापालिकेने ‘नो यूवर पोलिंग स्टेशन’ सेवा सुरू केली. त्यानुसार ८८८८००६६६६ या सारथी हेल्पलाइनद्वारे नागरिकांना मतदान केंद्राबाबत माहिती देण्यात येत आहे.

गृहनिर्माण संस्थांमधील शंभर टक्के मतदानाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ महापालिकेला सहकार्य करेल. महापालिकेच्या वतीने मतदानासाठी पुरविण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधा सोसायटीमधील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रिय सहभाग घेईल, असे पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Polling stations in housing societies in pimpri bhosari and chinchwad determined 100 percent voting pune print news ggy 03 sud 02