पुण्याजवळील सुपे येथील मयूरेश्वर अभयारण्यात पाणवठय़ावरील पाणी प्यायल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला, तर चिंकारासह विविध वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. अॅसिडचा टँकर या पाणवठय़ावर धुतल्याने किंवा रिकामा केल्याने दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या प्रकाराची चौकशी सुरू आहे. राज्य सरकार १ ते ७ ऑक्टोबर या काळात वन्यजीव सप्ताह साजरा करत असतानाच ही घटना घडली आहे.
सुपे अभयारण्य हे पर्जन्यछायेच्या प्रदेशात असून, ते चिंकारा, तसेच गवताळ प्रदेशातील प्राणी आणि पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्यातील पाडवी गावात ‘५६ मंदिरांचा ओढा’ या नावाने एक वाहता ओढा आहे. या ओढय़ाच्या ठिकाणी पाणी प्रदूषित असल्याचे आणि त्याच्या जवळपास अनेक पक्षी मरून पडल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. या घटनेची माहिती मिळताच काही वन्यजीव अभ्यासकांनी त्या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी केलेल्या पाहणीत चिखल्या (कॉमन सँडपायपर), पिवळय़ा चोचीच्या तसेच लाल चोचीच्या टिटव्या मरून पडल्याचे दिसले. अनेक पक्षी पाण्यातच मरून पडले होते. याशिवाय पाण्यातील बेडकांची पिले मेली होती आणि त्या पाण्यातील शेवाळे जळून त्याचा तवंग पाण्यावर जमा झाला होता.
या ठिकाणाची पाहणी केलेले पक्षितज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी सांगितले की, या ओढय़ाच्या पात्रात लाल आम्लयुक्त पाणी पाहायला मिळाले. जवळपासच्या उद्योगांचे आम्लयुक्त पाणी सोडल्यामुळे किंवा तसा टँकर धुतल्यामुळे या ओढय़ाचे पाणी दूषित झाले असावे. ते प्यायल्यामुळे पक्षी मेले आहेत. याशिवाय काही पक्षी पाणी प्यायल्यानंतर लांबच्या परिसरातही मरून पडले असल्याची शक्यता आहे. याचा धोका असा की, या परिसरात चिंकारा तसेच, चंडोल, धाविक (इंडियन कोर्सर) अशा दुर्मीळ पक्ष्यांचा मोठय़ा प्रमाणात वावर असतो. त्यांनासुद्धा या पाण्याचा धोका संभवतो. याबाबत आपण वन विभागाला माहिती दिली आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाचा शेवटपर्यंत शोध लावला जाणे गरजेचे आहे. असे पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय या घटना थांबणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.