पुणे : पुणे शहरातील पुढील २० वर्षांची प्रदूषणाची स्थिती नक्की कशी असेल, त्यावर महापालिका प्रशासनानचे नियोजन काय असेल, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला मंगळवारी केल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे (एमपीसीबी) अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्यासह प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेला भेट देऊन प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी पुढील २० वर्षात शहरात प्रदूषणाची स्थिती कशी असेल त्यावर महापालिकेची उपाययोजना नक्की काय असेल, याचा सविस्तर अहवाल महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करावा, अशा सूचना केल्या.

हेही वाचा >>>‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे रुग्ण आढळलेल्या भागात विहिरीतून पाणी ?

महापालिकेत झालेल्या बैठकीत शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्मशानभूमींमधील प्रदूषण नियंत्रण यंत्रणा, वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि घनकचरा व्यवस्थापन या चार प्रमुख विषयांवर सविस्तर चर्चा झाली. प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे सादरीकरण यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर केले.

प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक असलेला निधी राज्य सरकारच्या वतीने उपलब्ध करुन देण्याची तयारी यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दाखविण्यात आली. तसेच आवश्यक ते मार्गदर्शन व मदत महापालिकेला केली जाईल, अशी हमी देण्यात आली. घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेला जागा कमी पडत आहे. याबाबकत शासनाकडे पाठपुरावा करून महापालिकेला जागा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा शब्दही यावेळी देण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा >>>शिक्षण संस्थेतील रोखपाल महिलेकडून अडीच कोटींचा अपहार; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल

नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘जायका’ प्रकल्पाअंतर्गत नवे दहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र, त्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंतच्या काळात प्रक्रियेविनाच सांडपाणी नदीत सोडण्याऐवजी हे सांडपाणी निर्माण होणाऱ्या ठिकाणीच त्यावर प्रक्रिया करता येईल का? याची चाचपणी करण्यात यावी. प्रदूषण कमी करण्यासाठी सोसायट्यांमधील मैलापाणी प्रक्रिया केंद्र कार्यरत ठेवणे ही तेथील नागरिकांची जबाबदारी आहे. ती त्यांनी पार पाडलीच पाहिजे, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.

स्मशानभूमीमधील पार्थिव दहनाचा विषय संवेदनशील आणि किचकट आहे. सर्व बाजूंनी योग्य समतोल राखून जळावू लाकडाला पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्युत, गॅस दाहिनी सारख्या पर्यायांना नागरिकांनी प्राथमिकता द्यावी यासाठी जनजागृती केली जाईल, असेही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष कदम यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pollution control boards instructions to plan for pollution for the next 20 years pune print news ccm 82 amy