पुण्यातील थ्री स्टार आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समधे मैलापाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने अशा जवळपास १५ हॉटेल्सना नोटीस पाठवली आहे.
गेल्या काही वर्षांत पुणे हे बिझिनेस मीटिंगसाठीचे महत्त्वाचे ठिकाण मानले जाऊ लागले आहे. उद्योग क्षेत्राच्या परिषदा, बैठका या पुण्यात घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत पुण्यात थ्री स्टार्स आणि फाईव्ह स्टार्स हॉटेल्सची गर्दी होऊ लागली आहे. पुण्यात जवळपास थ्री स्टार आणि फाईव्ह स्टार दर्जाची जवळपास २५ हॉटेल्स आहेत. मात्र, प्रदूषण महामंडळाने घालून दिलेल्या नियमावलीकडे दुर्लक्ष केल्याचा फटका या हॉटेल्सना बसला आहे.
नियमानुसार थ्री स्टार आणि फाईव्ह स्टार दर्जाच्या प्रत्येक हॉटेलने त्यांच्याकडील मैलापाणी शुद्ध करूनच नदीत सोडणे आवश्यक आहे. हॉटेलने स्वखर्चाने ही यंत्रणा उभी करणे आणि कार्यान्वित करणे आवश्यक आहे. मात्र, बहुतेक वेळा परवानगी मिळवण्यासाठी यंत्रणा उभारली जाते. प्रत्यक्षात मात्र ती वापरली जातच नाही किंवा बंद अवस्थेतच ठेवली जाते. हॉटेल्सच्या या कारभाराला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दणका दिला आहे. मैलापाणी शुद्धीकरण यंत्रणा बंद ठेवणाऱ्या किंवा न उभारणाऱ्या जवळपास १५ हॉटेल्सना महामंडळाने नोटीस पाठवली आहे. महामंडळाची नोटीस मिळाल्यानंतर जागे झालेल्या हॉटेल्सनी आता ही यंत्रणा सुरू केल्याचे उत्तरही महामंडळाला दिले आहे.
याबाबत पुणे विभाग (भाग एक) चे उपप्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी सांगितले, ‘अनेक हॉटेल्सनी यंत्रणा उभी केली होती. मात्र, त्याचा वापर न करताच अशुद्ध पाणीच सोडले जात होते. यासंबंधी या हॉटेल्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर अनेक हॉटेल्सनी यंत्रणा कार्यान्वित केल्याचे उत्तर दिले आहे. त्याबाबत पाहणी करण्यात येणार आहे. ज्या हॉटेल्सनी उत्तरे दिलेली नाहीत किंवा पाहणी दरम्यान ज्या हॉटेल्समध्ये यंत्रणा नसल्याचे निदर्शनास येईल, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा