कमळाची फुले, मासे आणि पक्ष्यांनी सुशोभित दिसणाऱ्या सारसबागेतील तलावाचे सौंदर्य सध्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, चिवडा- फरसाणची पाकिटे, प्लॅस्टिकचे चहाचे कप अशा कचऱ्याने डागाळले आहे. बागेत फिरायला येणारे नागरिक या तलावात मोठय़ा प्रमाणावर कचरा टाकत असून त्यामुळे तलाव प्रदूषित होत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेने या तलावाच्या बाजूने माशांना खाद्य न टाकण्याबद्दल तसेच तलावात कचरा न टाकण्याबाबतचे फलक उभारले आहेत. सारसबागेत फिरायला येणाऱ्या नागरिकांवर मात्र या फलकांचा काहीही परिणाम झालेला नसून तलावात कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. कागद, प्लॅस्टिक, थर्माकोलचे तुकडे, प्लॅस्टिकचे चहाचे कप, बिस्किटे व चिवडय़ाची रिकामी पाकिटे, प्लॅस्टिकच्या बाटल्या असा कचरा तलावात साचून राहिला आहे. अर्धवट खाल्लेली फळे, काकडय़ा, भेळ असे खाद्यपदार्थही बिनदिक्कत तलावात टाकले जात आहेत. काही महाभाग तर तलावाच्या पाण्यात थुंकतानाही दिसत आहेत. सारसबागेत येणाऱ्या पारव्यांची संख्या खूप मोठी आहे. या पारव्यांना खाण्यासाठी काही नागरिक ब्रेडचे तुकडे टाकतात. पारव्यांबरोबर माशांना खाण्यासाठीही ब्रेडचे तुकडे तलावात ठिकठिकाणी टाकले जात आहेत. या सर्व गोष्टींमुळे तलाव प्रदूषित होत असून त्याचा तिथल्या माशांवर तसेच पक्ष्यांवरही विपरित परिणाम होईल की काय असा धोका निर्माण झाला आहे.  
उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे म्हणाले,‘‘सारसबागेतील तलावाची स्वच्छता पालिकेतर्फे नियमित केली जाते. या तळ्यात ‘पिस्तिया’ ही वनस्पती वाढत असून ती नियमित काढावी लागते. त्याबरोबरच प्लॅस्टिक काढण्याचाही प्रयत्न आम्ही करतो. रोज ३ ते ४ पाळ्यांमध्ये हे काम सुरू आहे. तळ्यात गाळ दिसत असला तरी कमळांना काही प्रमाणात चिखलाची आवश्यकता असल्यामुळे तो आवश्यक आहे. तळ्यातील माशांना नागरिक खायला देताना त्याबरोबरच प्लॅस्टिकही तळ्यात टाकले जात आहे.’’ 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा